सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे. आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला आहे. या लढ्यात खासदार संभाजीराजे देखील मराठा समाजाला पाठिंबा देताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर लहान मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला फोटो व्हायरल होतं आहे. खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरवर एक ट्विट करून आमच्या भविष्याचं काय असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये एका लहान मुलाचा फोटो आहे. त्याच्या हातात ‘आमच्या भविष्याचं काय’, असं लिहिलेली एक पाटी आहे. त्याच सोबत त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा देखील फोटो आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांनी हा फोटो म्हणजे मराठा समाजाच्या मनातील खदखद असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर समाजाच्या आक्रोशाला बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला तर तो तितकाच उफाळून येईल असा देखील इशारा सरकारला दिला आहे.
आमच्या भविष्याचे काय?या प्रश्नाचे उत्तर सरकार ला द्यावेच लागेल.
वरील छायाचित्र मराठा समाजातील खदखदीचे प्रतिनिधित्व करते.
समाजाचा आक्रोश बळाचा वापर करुन शमवण्याचा प्रयत्न कराल, तर तो तितकाच तो उफाळून येईल. म्हणून मी सरकार ला सांगू इच्छितो की आपण आंदोलकांच्या अक्रोशाचा सन्मान करा. pic.twitter.com/y9PY8EH9Av— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 22, 2020
त्यामुळे आंदोलकांच्या आक्रोशाचा सन्मान करावा अशी विनंती संभाजी राजेंनी राज्य सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत, त्यांना नोटिसा देण्यात येऊ नये यासाठी देखील पत्र लिहीली असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं.