राज्यसभेत कृषी विधेयकांवरील रविवारी झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांकडून वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी नियम पुस्तिका फाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यानंतर कारवाई करत आठ खासदारांचं निलंबन करण्यात आला. निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, रिपन बोरा, नझीर हुसेन, माकपचे के. के. रागेश, इलामारन करीम आणि आपचे संजय सिंह यांचा समावेश होता.
परंतु हे प्रकरण इथेच न थांबता निलंबीत झालेल्या आठ खासदारांनी या कारवाईच्या निषेधार्थ संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या सर्व आठ खासदारांनी काल रात्रभर जागरण करून आपले आंदोलन सुरूच ठेवले. हे आंदोलन थांबवणार नसल्याचे या खासदरांकडून सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने विरोधक आक्रमकाची भूमिका दाखवली आहे. जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान दोन दिवसांमधील राज्यसभेतील घडलेल्या घडामोडींमुळे व्यथित होऊन राज्यसभेचे उपसाभपती हरिवंश यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती हरिवंश यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून दिली आहे.