देशभरात आणि जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी या छोट्याशा गावाने लोकांसमोर आणि प्रशासनासमोर आदर्श घालून दिला आहे. या गावात सध्या एकही कोरोना रुग्ण नाही आणि सगळ्यात विशेष म्हणजे गावकऱ्यांनी मिळून स्वत: कोव्हिड सेंटर उभा केलं आहे.
सपकळवाडी हे गाव जेमतेम १००० लोकसंख्येचं आहे. मात्र गावातील लोकांनी सदैव गावासाठी एकत्र येऊन अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहून लोकांनीच ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ हा स्तुत्य उपक्रम राबवून गावासाठी कोव्हिड सेंटर उभं केलं आहे. यासाठी ‘रोटरी क्लब, बारामती’ने १० बेड आणि N-९५ मास्क देखील पुरवले, तसेच गावातील संवेदनशील लोकांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला. अशा प्रकारे गावकऱ्यांनी प्रशासनाकडून कोणताही निधी न घेता स्वतः हा उपक्रम राबवला आहे.
याच गोष्टीमुळे शेजारील इंदापूर आणि बारामती तालुक्यात मिळून जवळपास ४,५०० एवढे रुग्ण असून या गावात सध्या एकही रुग्ण नाही.
याआधीही सपकळवाडी गावाने अनेक योजना राबवल्या आहेत, असं गावचे सरपंच सचिन सपकळ सांगतात. या गावाने अनेक आदर्श योजना पूर्ण करून दाखवल्या आहेत. सध्या हे गाव हागणदारीमुक्त आहे. तसंच जे लोक वर्षभर सगळे कर भरतात,त्या लोकांना वर्षभर शुध्द पाणी आणि दळण हे मोफत मिळतं. त्याचबरोबर हे गाव हरित होतानाही दिसत आहे. गावामध्ये कुणाचा वाढदिवस असेल, तर त्यानिमित्त गावात ५ झाडे लावली जातात. आतापर्यंत अशी जवळपास ३००० एवढी झाले लावण्यात आली आहेत.
या अशा अनेक उपक्रमांमुळे गावाचं पंचक्रोशीत कौतुक होताना दिसत आहे.