जून महिन्यात झालेलं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातील बहुतेक ठिकाणांवरून दिसलं. मात्र, यासंबंधी असंख्य चुकीच्या समजुती आणि अंधश्रद्धा समाजामध्ये रूढ आहेत. सध्याचं युग विज्ञानाचं असून देखील अनेक ठिकाणी यासंबंधी प्रसार न झाल्यामुळे लोक ग्रहण पाळणे वगैरे गोष्टी सर्रास करताना दिसतात. परंतु या सगळ्यामध्ये सांगली जिल्ह्यात विज्ञानाला पूरक आणि दिलासा देणारी घटना समोर आली आहे.
काय आहे ही घटना?
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या गावच्या जाधव कुंबियातील गर्भवती महिलेने ग्रहण काळात निषिध्द मानल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी केल्या उदा. भाजी चिरणे, पाणी पिणे, अनेक शारीरिक हालचाली करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः हे ग्रहण सोलर चष्म्यातून पाहिलं होतं.
समृद्धी चंदन जाधव हे या महिलेचं नाव. आता त्यांनी एका छानशा मुलीला जन्मदेखील दिला आहे आणि ती सुदृढ देखील आहे. अशा प्रकारे या महिलेने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अतार्किक गोष्टींना मूठमाती दिली आहे आणि समाजासमोर एक उदाहरण म्हणून समोर आल्या आहेत.
इस्लामपूरमधील महात्मा फुले कॉलनीत राहणाऱ्या या महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेल्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, “आजचं युग हे इंटरनेटचं आहे आणि अशा काळात या अंधश्रद्धा बाळगणं चुकीचं आहे. ‘अंनिस’ने आमच्या कुटुंबाचं प्रबोधन केल्यानंतर आम्ही हे धाडसी पाऊल टाकलं. माझ्या कुटुंबीयांची साथ देखील तितकीच महत्वाची होती.”
यावेळी इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल यांनी सांगितलं होतं की, ”अनिंसचा हा कार्यक्रम खरंच दिशादर्शक आहे. ग्रहणाच्या काळात खरंतर बाळावर काहीच वाईट परिणाम होत नाही. ही निव्वळ अंधश्रध्दा आहे आणि हे सगळं आजच्या कार्यक्रमातून समोर येईल.”
आणि खरोखरच आता समृद्धी जाधव यांना झालेली सुदृढ मुलगी पाहून हे सिध्द झालं आहे की, ग्रहणामध्ये गरोदर बाईने काही विशिष्ट गोष्टी केल्या की त्याचा बाळावर वाईट परिणाम होतो.
ग्रहण म्हणजे नेमकं काय?
ग्रहण हा खगोलशास्त्रीय भाग आहे. सुर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या एकमेकांसमोर येण्याने पडलेल्या सावलीला आपण ग्रहण म्हणतो.
ज्यावेळी सुर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्यावेळी सुर्य झाकला जातो आणि त्याची सावली पृथ्वीवर पडते त्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो.
त्यामुळे अशा गोष्टींचा आणि गरोदर स्त्रिया आणि त्यांच्या बाळाशी या गोष्टीचा काहीएक संबंध नसतो. आपल्या देशातील लोकांची यांद्दल जागृती करून वेळीच अशा अंधश्रध्दांतून बाहेर काढणं महत्वाचं ठरणार आहे.