सध्या कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक लोकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन पैशाची अडचण निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेक लोक घेतलेली कर्ज, वस्तू याचे हप्ते भरण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातील शिवधर्म फाऊंडेशन यांनी बारामती तहसीलदार यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील लोकांचे हप्ते ३१ डिसेंबरपर्यंत पुढं ढकलावे, अशी विनंती केली आहे.
या पत्रामध्ये त्यांनी, “कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले असून, अनेक घरातील करते पुरुष मृत्युमुखी पडले आहेत, तर प्रोडक्शनची मागणी कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी कामगार कपात देखील झाली आहे. त्यामूळे अनेक व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते भरणं कठीण झालं असून, त्यांना उदरनिर्वाह करणं अवघड झालं आहे.” असं म्हटलं आहे.
“अशा परिस्थितीत लोकांना हप्ते भरणं शक्य आहे का? त्यांनी जगावं की मरावं..याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. नाहीतर लोक कर्जाच्या हप्त्यांमुळे आत्महत्या करतील. त्यामुळे आम्ही फक्त हप्ते पुढं ढकलण्याची विनंती करत आहे, ना की हप्ते माफ करा असं आम्ही म्हणतोय. जर याची दखल घेतली गेली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत हप्ते पुढे ढकलावे अशी विनंती करत आहोत.” असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
तहसीलदारांना हे पत्र देतानाचा त्यांनी फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता सरकार याची दखल घेऊन नागरिकांचे हप्ते पुढं ढकलणार का? आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळी साम्राज्या फाऊंडेशनचे सदस्य देखील उपस्थित होते.