अनेक जणांच्या दिवसाची सुरुवात कॉफी पिण्याने होत असते. कॉफीच्या बिया तोडणं, त्यांना वाळवणं, भाजणं ही कॉफी बनवण्याची नेहमीची पद्धत आहे. मात्र हत्तीच्या विष्टेतून निघालेल्या बियांपासून कॉफी बनवलेली कधी ऐकलं आहे का?
थायलंडमध्ये ‘ब्लॅक आइवरी कॉफी’ हत्तीच्या विष्टेतून निघालेल्या कॉफीच्या बियांपासून तयार केली जाते. ही काॅफी खूप महाग असते. कारण 30 किलो कॉफीच्या बियांपासून फक्त एक किलो कॉफी तयार होते. जर तुम्हाला एक कप कॉफी प्यायची असेल तर 50 अमेरिकन डॉलर म्हणजेच साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात.
तर तुम्हाला ही काॅफी कशी बनते, हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.
ब्लॅक आइवरी कॉफी कशी बनवली जाते?
ब्लेक डिंकीन यांनी तयार केलेल्या या काॅफीच्या संशोधनासाठी तब्बल 10 वर्षे लागली. ही काॅफी तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे केवळ विज्ञान असल्याचं त्यांनी सांगितलंय.
चला तर ही काॅफी नेमकी तयार कशी होते हे पाहू!
सुरवातीला हत्तींना अरेबिका कॉफी बिया खायला दिल्या जातात. खरंतर हत्तीला तांदूळ, केळी आणि चिंच हे खाद्य म्हणून आवडतं. या खाद्यासोबतच कॉफी बिया दिल्या जातात.
त्यानंतर हत्तीच्या विष्ठेतून या बिया बाहेर येतात. त्यानंतर त्यांच्यावर प्रक्रिया करून कॉफी बनवली जाते. मात्र कॉफी बिया हत्तीला खायला घालण्याची नेमकी काय गरज होती, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर हत्तीच्या पोटात असलेल्या विकरांच्या (Enzymes) मदतीने कॉफी बियांचा कडवटपणा जातो. त्यामुळे कॉफीचा देखील कडवटपणा निघून जातो. या पचनक्रियेसाठी 12 ते 72 तासांचा कालावधी लागतो. हत्तीच्या पोटात असलेल्या रसायनांमुळे कॉफीच्या बियांमधील प्रोटीनचे विघटन होते. जेवढे प्रोटीनचे प्रमाण कमी, तेवढं कडवटपणा कमी. यामुळेच कॉफीला विशिष्ट चव प्राप्त होते.
शाळकरी मुलांना कामाचे पैसे देखील मिळतात
विशेष म्हणजे हत्तीच्या विष्टेतून बाहेर पडलेल्या बिया गोळा केल्या जातात व स्थानिक शाळेतील मुलांकडे दिल्या जातात. त्यानंतर या बिया मुलांकडून धुवून घेतल्या जातात व वाळवल्या जातात. या कामाचे मुलांना पैसे देखील मिळतात.
त्यानंतर बिया रोस्ट (भाजल्या) जातात व त्यापासून जगप्रसिद्ध काॅफी तयार केली जाते.
दरवर्षी फक्त 140 किलो कॉफीची निर्मिती केली जाते. त्यामुळे जगातील सर्वात महाग आणि दुर्मिळ कॉफी म्हणून ब्लॅक कॉफी ओळखलं जातं. ही कॉफी इतकी महाग असल्याने जगभरातील फक्त पाच हॉटेलमध्ये मिळते. पण वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ती विकत घेऊ शकता.
काही उत्पन्न हत्तींच्या संवर्धनासाठी वापरलं जातं
ही कॉफी सुरुवातीला गोल्डन ट्रँगल एशियन एलिफंट फाउंडेशनकडून तयार केली जात होती. ही संस्था सुटका केलेल्या हत्तींची देखभाल करते. आता या कॉफीची निर्मिती उत्तर-पूर्व थायलंडमध्ये केली जाते. तेथे २६ हत्ती या कॉफीच्या निर्मितीसाठी आहेत. विशेष म्हणजे कॉफीच्या माध्यमातून मिळणारं 8% उत्पन्न हत्तींच्या आरोग्यासाठी वापरलं जातं.
या लेखात वापरलेले फोटो ब्लॅक आइवरी कॉफीच्या Instagram वरून घेतले आहेत.