रविवारी लोकसभेत मंजूर झालेल्या कृषि विधेयका विरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्याने कोरोना पार्श्वभूमीवर आज भारत बंदची हाक दिली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यापासून शेतकरी मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनाचा परिणाम पंजाब व हरियाणा येथे दिसून येणारं असून पंजाब बंदसाठी ३१ शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. या आंदोलनात काँग्रेस, आरजेडी, समाजवादी पार्टी, अकाली दल, असे अनेक पक्ष सहभागी झाले आहेत.
शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक२०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक२०२०, आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक२०२०, या विधेयकांचा अध्यादेश लोकसभेत सादर केल्यापासून यावर अनेक टिका केल्या जात आहेत.
शेतकऱ्यांची विधेयकाला नामंजुरी असताना देखील सरकार यावर योग्य निर्णय घेत नसल्याने शेवटी २५ सप्टेंबर पासून पुढील तीन दिवसांसाठी शेतकऱ्याने ‘रेल रोको’ आंदोलन सुरू केले आहे. यासाठी राज्यातील ३५० पेक्षा जास्त शेतकरी संघटना एकत्र येऊन विरोध करत आहेत. पंजाब मधील रस्ते, गाव, स्थानके अश्या अनेक ठिकाणी सध्या निदर्शने सुरू आहेत. यासोबत बिहार व पश्चिम बंगाल मधून ही भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.