कोरोना काळात लोकांची मानसिक स्थिती सांभाळायला मनोरंजनाने खूप मदत केली. टीव्हीवरच्या सिरियल्स, मराठी, हिंदी चित्रपट, नेटफ्लिक्स यासारख्या माध्यमातून लोक मनोरंजन करत आहे. या काळात जर मनोरंजन नसतं तर काय झालं असतं? याचा फक्त विचार केलेलाच बरा!
दरम्यानच्या काळात अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधलं. कंगनाच्या या विधानावर अनेक कलाकारांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला. त्यात मराठी कलाकारांचा देखील समावेश होता. मात्र अनेक लोकांनी मराठी कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केलं.
अनेक लोकांनी मराठी कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये नोकराची भूमिका करतात असं म्हणून खिल्ली उडवली.
तसंच मराठी कलाकार स्कूटर विकत घेतली तरी पोस्ट टाकतात, असं म्हणून कलाकारांचा अपमान केला.
मात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी अशा लोकांना सणसणीत उत्तर दिलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये त्या म्हणतात की, “सध्या जे सगळ्या बाजूंनी वातावरण तापलंय ते नक्की आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? सतत सगळे एकमेकांना शाब्दिक थोबडवत असतात. सतत आम्ही किती हुशार, तुम्ही किती मूर्ख, तुम्ही कसे चुकलात, आम्ही किती बरोबर हेच चाललेलं असतं.”
“बरं, हे सगळं चालू असताना मीडियाची जी काही धावपळ, धक्काबुक्की, ढकलाढकली चालू असते ते वेगळंच.”
“आमच्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या काही लोकांनी आपलं मत व्यक्त केलं, विरोध दर्शवला की त्यांना हिंदीमध्ये नोकराची, मित्राची कामं करणारे नटनट्या म्हणून हिणवलं जातं किंवा इथे अत्याचार झाले, तेव्हा कुठे होते? तिथे अन्याय झाला, तेव्हा कुठे होते? असं बरंच काही तोंडसुख घेतात. ”
“आम्ही खूप सामान्य कलाकार आहोत. तुम्हा प्रेक्षकांना मायबाप मानणारे आम्ही कलाकार आहोत. हे मराठी कलाकारांवर पूर्वापार झालेले संस्कार आहेत.”
“हो, आम्ही केलीत नोकराची आणि मित्रांची कामं हिंदीत, पण आमच्या समोर भल्याभल्या हिंदी हिरोची अभिनय करताना हातभर फाटलीय, नोकर आणि मित्रांसारख्या नगण्य भूमिका आपल्या मराठी नटांनी सरस करून ठेवल्यात.”
“आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो टाकतो. कारण ते आपल्या कष्टातून आलेल्या पैशातून असतात. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक कलाकार श्रीमंत असतो?”
“तुम्हाला दिसताना खूप ग्लॅमर दिसत. पण इथेही खूप कष्ट आहेत, त्यात इथे नशिबाचा भाग पण खूप जास्त आहे, खूप असुरक्षित वातावरण असत इथे. बॉलिवूडसारखं आमचं बजेट नसतं.”
“कारण आमच्या पिक्चरांना थिएटर मिळत नाहीत, ज्यांच्याकडे काम आहे, त्यांच्याकडे आहे , काहीजण कित्येक महिने घरात बसून काढतायत खूप वाईट स्थिती आहे.”
“आर्थिक व मानसिक दृष्ट्या फार कठीण काळ आहे, अश्या वेळी आपलेच मायबाप प्रेक्षक अत्यंत घाणेरड्या पध्दतीने जर बोलायला लागले तर काय करायचं? कुणी येणार आहे का आमची घरं चालवायला?”
प्रिया बेर्डे म्हणाल्या की काही कलाकार आपलं मत व्यक्त करताना ओव्हररिॲक्ट होतात पण यामुळे कुणालाही आयमायच्या भाषेत बोलायचा अधिकार नाही.
त्या म्हणाल्या की, “गेल्या सहा महिन्यात तुम्ही टीव्हीवर आमचेच कार्यक्रम, चित्रपट, मालिका पाहत स्वतःच मनोरंजन करत आहात. एवढेच नव्हे तर “आमचं क्षेत्र नसतं तर या कठीण काळात तुम्ही काय केलं असतं?”, असा भावनिक प्रश्न देखील त्यांनी लोकांना विचारला.
“आम्ही तुम्हाला मायबाप समजतो तर तुम्ही देखील याची जाणीव ठेवा,” अशी विनंती त्यांनी लोकांना केली. त्यामुळे प्रिया बेर्डे यांनी लिहिलेली पोस्ट प्रेक्षक म्हणून विचार करायला लावणारी आहेच; त्याचबरोबर माणूस म्हणून देखील अंतर्मुख करणारी आहे.