फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या आदेशानुसार मिठाई विक्रेत्यांना मिठाई बॉक्सवर एक्सपायरी डेट (अंतिम मुदत) देणं बंधनकारक असणार आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. पण मिठाई कधी तयार केली, याची तारीख मिठाईवर द्यायची की नाही हा निर्णय विक्रेत्यांचा राहील. मात्र मिठाईची एक्सपायरी डेट देणं त्यांना बंधनकारक असणार आहे.
अनेक ठिकाणी खराब झालेल्या मिठाई लोकांना विकल्या जातात. त्यातून लोकांना विषबाधा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) हे आदेश दिले आहेत.
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते. या दरम्यान भेसळीचं प्रमाण देखील जास्त होतं. अशा स्वरूपातील पदार्थ खाल्ल्याने लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मिठाईवर एक्सपायरी डेट देण्याचा निर्णय लोकांच्या तक्रारीनंतर एफएसएसएआयने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना ताजी मिठाई मिळेल.