या जगात मालकवर्ग, श्वेतवर्णीय, पुरुषसत्ताक व्यवस्था आणि भारतातील सवर्ण जन्माला आलेत आणि त्यांनीच स्वतःची सत्तास्थान टिकविण्यासाठी ‘विषमता’ आणली. या लोकांच्या अथवा वृत्तीच्या विरुद्ध असंख्य लढे जगभर उभारले गेले. न्याय -अन्यायाच्या तराजूत तोलले गेले. परंतु खैरलांजी ही जखम समताधिष्ठित समाजरचना करू बघणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना फार ‘उद्विग्न’ वाटते. कारण, खैरलांजी या अन्यायकारी गावाला शासकीय पद्धतीने ‘आदर्श गाव’ म्हणून पुरस्कृत केलं गेलं होतं.
मागे एका पोलीस अधिकाऱ्याने जीव घेतलेल्या ‘जॉर्ज फ्लॉयड’ बद्दलचा लढा हा जगभर तीव्र झालेला होता. #BlackLivesMatter च्या नावाने अनेक लोक ट्रेंड द्वारे समाज माध्यमांवर व्यक्त होत होते. परंतु यात मुख्य बाब म्हणजे कृष्णवर्णीय जनतेसोबत इतर श्वेतवर्णीय लोकही सामील झाले होते. असे शोषकवर्गातून घोषणा देत असलेले हात या देशात अद्याप ही जन्मलेले नाही ही बाब लक्षात घ्यावी लागणार आहे. तसेच सामाजिक प्रतिबिंब दाखवणारे आणि समाजाची पुनर्बांधणी करणारे साहित्य चळवळीत ही निग्रोंच्या लेखणीला ओ’निल किंवा फॉकनर यांसारखी असंख्य हात लागली ती या देशात क्वचितचं आहे असचं चित्र आजवर आहे.
खैरलांजीचा अर्थ एका दलित कुटुंबाची हत्या, अन्याय, नग्न धिंड यांच्याही पुढे वास्तव जाणवते. जे आज आमच्यापुढे १४ वर्षे होऊन ही शिल्लक आहे. या घटनेचं चिंतनात्मक विश्लेषण करीत असतांना न्यायाच्या अपेक्षेत हार्ट अटॅकने मृत्यू झालेला ‘भैय्यालाल भोतमांगे‘ आज ही केंद्रस्थानी दिसतो. अनेक लढ्यात ‘प्रातिकात्मक दृष्ट्या’ जाणवत असतो. आज त्याला न्याय देण्याची गरज आहे.
कोरोना संसर्ग आणि त्यासोबत आलेल्या लॉकडाऊन काळात ही ‘अरविंद बनसोड’ सारखी अनेक प्रकरणं महाराष्ट्राने बघितली. ही जातीची वास्तवता आणि शोषकाची वाढती ताकद लक्षात घेत तिला रोखण्याची गरज आहे. अन्यथा, समता प्रस्तापित करण्याचा मोह आवरायला हवा. तसेचं, स्त्रीवादाच्या गाभाऱ्यात लैंगिक स्वातंत्र्य -लग्नबंधन इ.च्या पुढे जात बहुजन स्त्रियांच्या अस्तित्वाची आणि शोषणाची मांडणी स्त्रीवादी कार्यकर्त्यांना करावी लागणार आहे, तेव्हा कुठे ‘प्रियंका -सुरेखा‘ मोकळ्या श्वासाच्या धनी होतील.
खैरलांजीत आंबेडकरी समूहाने आणि समतावादी लढ्यांनी काय गमावलं? याची पुरेशी मांडणी या १४ वर्षांत आपण केलेली आहे. या नंतर येणाऱ्या असंख्य लढ्यांशी आपण संविधानिक चौकटीत संघर्ष केला आहे. अनुसूचित जाती -जमातींच्या संरक्षणासाठी असलेल्या अॅट्रसिटी संदर्भात व्यवस्थेने निर्माण केलेल्या संभ्रमित भूमिकेला छेद देत आपली जागरूकता दर्शवली आहे. परंतु, तरी ही ‘भैय्यालाल’ उकरून वरती आलेल्या प्रेतासारखा उरी भार वाटतचं असतो. आज त्याला न्याय देण्यासाठी समतावादी कार्यकर्त्यांनी ‘सामाजिक न्याय, समताधिष्ठित समाजरचना व्हाया संविधानाची अंमलबजावणी’ याचं मार्गे आगेकूच करण्याची गरज आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शासनकर्ते व्हा!’ संदेशाच्या किमान आसपास राहण्याची गरज आहे.
शेवटी संविधानकर्त्याचे शिलेदार ‘वामनदादा कर्डक’ माणसाला वंदन करत प्रत्येकाच्या काळात समानता गातचं असतात –
“माणसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे
तुझ्या शोषणाचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनि पडावे
एकाने हसावे -एकाने रडावे, ऐसें विश्व आता येथे न उरावे!”