उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या 19 वर्षीय दलित युवतीचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील कायदा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मंगळवारी पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर हाथरस पोलिसांनी तिच्या पार्थिवावर मध्यरात्री ३ वाजता अंत्यसंस्कार केले.
आता पीडितेच्या कुटुंबाने हाथरस पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे देखील सांगितले जात आहे. पार्थिव घरी आणलं जावं यासाठी पोलिसांकडे पीडितेचे कुटुंब वारंवार विनंती करत होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पोलिसांवर केला जात आहे.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, “आम्ही या अंत्यसंस्काराला विरोध करत असतानाही तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. हिंदू संस्कृतीमधील परंपरेनुसार आम्हाला मुलीवर अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळेच आम्ही दिवसा अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती.”
“आमच्या सर्व नातेवाईकांनी मुलीच्या अंत्यस्कारामध्ये सहभागी होऊन तिचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. मात्र आमच्या मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले. आमच्यापैकी कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही.”
ते म्हणाले की, “कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. मला माझ्या मुलीचे अंतिम दर्शनही पोलिसांनी करु दिले नाही. अंत्यसंस्काराआधी मला तिचा चेहराही पाहता आला नाही.’
हाथरस पोलिसांनी या आरोपांचं खंडन केलं असून घरच्यांच्या परवानगीने अंत्यसंस्कार केले असल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी बलात्कार झाल्यानंतर त्वरित कारवाई का केली नाही? इतका उशीर का करण्यात आला? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या कुटुंबाचं सांत्वन केलं असून 25 लाखाची मदत तसेच घर आणि नोकरी देण्याची घोषणा केली आहे.