कोरोना विषाणूने जगभरात घातलेल्या थैमानानुळे सर्व शाळा आणि विद्यालये बंद झाली आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात उदयास येताना दिसत आहे. मात्र, अनेक लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना मोबाईल आणि लॅपटॉप वर शिकणं अशक्य होत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसात अनेक आत्महत्या केलेल्या घटना समोर आल्या आहेत. यातूनच सातारा जिल्ह्यातील एका शाळकरी मुलीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पिडीत मुलीच्या कुटुंबाची परिस्थिती ही हलाखीची होती. तिच्या वडिलांचा देखील २००७ मध्ये मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती अजूनच गंभीर होती. कोरोनामुळे संपूर्ण जग थांबलं असलं तरी शिक्षण मात्र ऑनलाईन पध्दतीने चालू आहे. या मुलीकडे मोबाईल नसल्यामुळे ती निराश झाली होती. त्यामुळे तिला अभ्यासाचा ताण आला होता. यातूनच तिची आई बाहेर गेली असता या मुलीने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी असं सांगितलं की, ही मुलगी लेक्चर करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जात होती, मात्र तिला स्वतला मोबाईल हवा असल्याची मागणी देखील तीनं तिच्या आईकडे केली होती. या घटनेमुळे कराड तालुक्यातील ओंड गावातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आणि अशा गोष्टींमुळे अजुन किती बळी जाणार? हा प्रश्न आता लोकांना सतावत आहे.