हाथरसमधील ठाकूर रेप केस प्रकरणी योगी सरकारवर देशभरातून टीका होत असताना दिसत आहे. हाथरसमधील ठाकूर तरुणांनी एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी एकच रात्रीत पिडितेच्या कुटुंबीयांना न सांगता मृतदेह जाळल्यामुळे पूर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं होतं.
याबाबत युपी सरकारवर देशभरातील लोकांनी संताप व्यक्त केला होता. याबाबत काँग्रसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.
याबाबत बोलताना गुलाम आझाद म्हणाले की “युपी मध्ये काही सिस्टीम आहे का?’ जेव्हापासून योगी सरकार युपीमध्ये आलं आहे, तेव्हापासून माॅब लिंचींग, विरोधी नेत्यांची हत्या अशा घटना घडत आहेत आणि या गोष्टी आता युपी मध्ये सामान्य आहेत, त्यात काही विशेष नाही.”
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील हाथरस मधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता.
काय होती घटना?
१४ सप्टेंबर रोजी हाथरसमधील दलित तरुणीवर ठाकूर तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. यामध्ये आरोपींवर तरुणीची जीभ कापल्याची आणि माकडहाड मोडल्याचा आरोप होता. त्यानंतर तिची प्रकृती खराब झाल्यामुळे तिला दिल्लीला हलवण्यात आलं. मात्र सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.