भारतात जगातील सर्वात मोठा ठरणारा बोगदा तब्बल १० वर्षांनंतर बांधून पूर्ण झाला आहे. या बोगद्याचं नाव ‘अटल टनल रोहतांग’ असं नाव आहे. हा बोगदा तब्बल ९.०२ किमी एवढ्या लांबीचा आहे. याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. हा बोगदा भारताच्या युद्धनीती धोरणाचा महत्वाचं मुद्दा असणार आहे आणि यामुळे लष्कराला पाकिस्तान, चीन सीमेपर्यंत प्रवेश करणं सोपं जाणार आहे.
यासाठी तब्बल ३,३०० कोटी रुपये एवढा खर्च आला आहे. हा जगातील सर्वात जास्त उंचीवर म्हणजे १०,०४० फूट एवढ्या उंचीवर बांधण्यात आला आहे.
काय फायदे होणार?
या बोगद्यामुळे मनाली आणि लेह यादरम्यानचं अंतर ४६ किमी ने कमी होणार आहे.
यामुळे लाहौल येथील लोक थंडीमध्ये हिमवृष्टी मुळे सहा सहा महिने जगापासून विनासंपर्क राहणार नाही.
यामुळे केवळ दीड तासात मनालीपासून केलांग पर्यंत पोहचता येणार आहे त्याचबरोबर या भागातील पर्यटनावर देखील चांगला फरक पडणार आहे.
काय सुविधा असणार या बोगद्यामध्ये?
या बोगद्यात दर १५० मीटरवर टेलिफोनची सुविधा असेल. ६० मीटरवर हायड्रेंट तसंच ५०० मीटरवर संकटकाळात बाहेर पडण्यासाठी मार्ग असणार आहे. त्याचबरोबर दर २५० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत आणि प्रत्येक १ किमी वर हवेची गुणवत्ता तपासण्याची सुविधा असणार आहे.
२००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी या बोगद्याच्या उभारणीची घोषणा केली होती. या बोगड्याचं भूमिपूजन २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते झालं होतं आणि आता त्यानंतर १० वर्षांनी हा बोगदा पूर्ण होऊन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे.