हाथरस बलात्कार प्रकरणाने देशाचं वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात प्रशासन आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. आता सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्याचा दावा करणारा फोटो व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत योगी आदित्यनाथने, “ठाकुर का खून गर्म होता है, ठाकुरों से गलती हो जाती है”, असं म्हटल्याचा दावा केला आहे. या फोटोत आज तक हिंदी न्यूज चॅनलचा लोगो देखील वापरण्यात आला आहे.
हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हाट्सअपवर शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खरंच अशी प्रतिक्रिया दिली आहे का हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला.
हे तपासण्यासाठी आम्ही आज तकच्या यूट्यूब चॅनलवर सुरू असलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आधार घेतला. लाईव्ह स्ट्रीमिंगचा स्क्रीनशॉट घेऊन त्यात वापरण्यात आलेला फाॅन्ट, लोगो याची तुलना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोसोबत केली.
जर या दोन फोटोंची तुलना केली तर त्यात वापरण्यात आलेल्या फाॅन्टमधील फरक लक्षात येईल. त्याच बरोबर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या फोटोत एका कंपनीच्या जाहिरातीचा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख खालच्या बाजूला ब्रेकिंग न्यूजची पट्टी आहे, त्याच ठिकाणी केला गेला आहे. मात्र खऱ्या फोटोत हा उल्लेख वरच्या बाजूला आहे.
त्याचबरोबर वायरल करण्यात आलेल्या फोटोत व्याकरणाच्या चुका देखील दिसून येतात.
त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला फोटो एडिट करण्यात आलेला आहे. तसंच योगी आदित्यनाथ यांनी अशा प्रकारचं कोणतंही विधान केले नाही.