वैद्यकीय क्षेत्रातील 2020 चा नोबेल पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ हार्वे अल्टर, चार्ल्स राईस आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकल होवटन या तिघांना जाहीर करण्यात आला आहे. रक्तातून प्रसार होणाऱ्या हिपॅटायटीस-सी या व्हायरसचा शोध लावल्याबद्दल हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नोबेल कमिटीने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हिपॅटायटीस-सी व्हायरसचा शोध लावणं का महत्त्वाचं होतं हे स्पष्ट केलं आहे.
एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया करत असताना रक्ताची गरज भासते. अनेक जणांना रक्तातून हिपॅटायटीस-सी व्हायरसची लागण झाली होती. कारण रक्तात हिपॅटायटीस सी व्हायरसचं अस्तित्व शोधून काढण्याचं तंत्रज्ञानच अस्तित्वात नव्हतं. पण तीन शास्त्रज्ञांच्या अभ्यासामुळे आता एखाद्या व्यक्तीच्या रक्तात हिपॅटायटीस सी व्हायरस आहे का, हे शोधणं शक्य झालं आहे. त्याचबरोबर हिपॅटायटीस-सी व्हायरसवर नवीन औषध बनवण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचं ठरेल.
नोबेल कमिटीने म्हटलं आहे की, हिपॅटायटिस-सी व्हायरसच्या शोधामुळे इतिहासात प्रथमच हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळं हिपॅटायटीस-सी व्हायरसमुळे होणार्या आजाराचं जगातून समूळ उच्चाटन करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2020
The 2020 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded jointly to Harvey J. Alter, Michael Houghton and Charles M. Rice “for the discovery of Hepatitis C virus.” pic.twitter.com/MDHPmbiFmS
हिपॅटायटीस व्हायरस आणि कावीळ
हिपॅटायटीस व्हायरसमुळे काविळीचा आजार होतो. हा आजार हिपॅटायटीस ए, बी, सी, डी या वेगवेगळ्या व्हायरसमुळे होतो.
हिपॅटायटिस ए आणि ई या व्हायरसमुळे होणारी कावीळ उपचाराने बरी होते. मात्र बी आणि सी व्हायरसमुळे झालेली कावीळ बरी होणं अवघड असतं. हिपॅटायटिस ए व्हायरसचा प्रसार दूषित अन्न आणि पाणी यामधून होतो. मात्र हिपॅटायटिस सी व्हायरसचा प्रसार दूषित रक्तातून होतो.
पण अमेरिकन शास्त्रज्ञ हार्वे अल्टर, चार्ल्स राईस आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकल हावटन यांच्या संशोधनामुळे हिपॅटायटीस-सी या व्हायरसवर औषध तयार करणं सोपं झालं आहे.
या अगोदर 1976 मध्ये हिपॅटायटिस-बी या व्हायरसचा शोध लावल्याबद्दल बारूच ब्लम्बर्ग यांना वैद्यकीय शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
हे संशोधन महत्त्वाचं का आहे?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात दरवर्षी हिपॅटायटीस अर्थात काविळीचे 7 कोटी रुग्ण आढळतात. त्यातील चार लाख रुग्णांचा मृत्यू होतो. या विषाणूमुळे यकृताचे नुकसान होतं. यावरून हिपॅटायटीस व्हायरसवर औषध निघणं का महत्त्वाचं आहे हे समजू शकतो. हिपॅटायटीस सी व्हायरसचा शोध लावल्यामुळे त्यावर औषध तयार करणं आणि रक्तात त्याचं अस्तित्व शोधणे शक्य झालं आहे.