महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पश्चिम घाट परिसरात पुण्याच्या वैज्ञानिकांनी पानगोंद वनस्पतींच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या शोधलेल्या प्रजातींमध्ये औषधी गुणधर्म असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेत काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी ही कामगिरी केली आहे.
पश्चिम घाट परिसर जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या 35 महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. पानगोंद प्रजातीच्या वनस्पती मान्सून काळात उगवतात. त्यांचा जीवन काळ हा मर्यादित स्वरूपाचा असतो. सध्या भारतात या वनस्पतीच्या 111 प्रजाती आहेत. त्यातील बहुतेक प्रजाती पश्चिम घाट आणि हिमालयाच्या पूर्व भागात आढळतात. महत्त्वाचं म्हणजे 111 प्रजातींपैकी 70 टक्के प्रजाती देशी आहेत.
कसा लागला या दोन प्रजातींचा शोध
पश्चिम घाटात जैवविविधतेचा अभ्यास करतांना शास्त्रज्ञांना या दोन नवीन पानगोंद वनस्पतीच्या प्रजातींचा शोध लागला. शास्त्रज्ञांनी पानगोंद वनस्पतीच्या वेगवेगळ्या प्रजातींचे नमुने घेण्यास सुरुवात केली. त्यांनी जास्तीत जास्त नमुने गोळा करण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा 2 नमुन्यांमध्ये वेगळी वैशिष्ट्ये शास्त्रज्ञांना दिसून आली. त्यानंतर वनस्पतीच्या डीएनएचा अभ्यास करण्यात आला. तयातून शास्त्रज्ञांना समजलं की या दोन प्रजाती नवीन आहेत. या संशोधनाचं नेतृत्व करणारे डॉक्टर रितेश कुमार चौधरी म्हणाले की, “या प्रजातींची ओळख करणं अवघड काम असतं. कारण सगळ्या प्रजाती जवळपास सारख्याच दिसतात.”
शास्त्रज्ञांनी शोधलेल्या दोन प्रजातींपैकी एक प्रजात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडली आहे. तर दुसरी प्रजाती कर्नाटकात आढळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या प्रजातीला ‘एरिओकोलोन परवीसेफॅलम’ असं नाव दिलं असून कर्नाटकातील प्रजातीला ‘एरिओकोलोन कारावलेन्स’ हे नाव दिल आहे.
पानगोंद वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. ‘एरिओकोलोन सियनेरम’ या प्रजातीमध्ये कर्करोग विरोधी, वेदनाशामक, सूजनाशक आणि स्नायू घट्ट करणारे औषधी गुणधर्म आढळले आहेत. ‘एरिओकोलोन क्विंक्वांगुलेर’ ही प्रजाती यकृताच्या आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. आता शास्त्रज्ञांनी नवीनच शोधलेल्या प्रजातींचा औषधी वापर होतो का याचा अभ्यास चालू केला आहे.