भौतिक शास्त्रातील 2020 चा नोबेल पुरस्कार कृष्णविवराचा अभ्यास करणार्या संशोधकांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार रॉजर पेनरोज, रेनहार्ड गॅझेल आणि ॲंड्रिया गेज या तिघांना देण्यात येणार आहे. हे तिघे भौतिकशास्त्रातील 114 वा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे शास्त्रज्ञ ठरले आहेत.
काय आहे नेमकं संशोधन?
अल्बर्ट आईन्स्टाईनने जनरल थेअरी ऑफ रिलेटीव्हीटीच्या (सापेक्षतावादाचा सिध्दांत) मदतीने अवकाशात कृष्णविवराचं अस्तित्व असल्याचं भाकित केलं होतं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील रॉजर पेनरोज यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे हे भाकीत खरं असल्याचं सिद्ध केलं आहे. थोडक्यात अल्बर्ट आईन्स्टाईन यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन नंतर सापेक्षतावादाच्या सिध्दांतासाठी महत्वाचं कार्य करणारे गणितीय भौतिकशास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांचं नाव घेतलं जातं.
सर्वात प्रथम 1916 मध्ये ‘सापेक्षतावादाचा सिध्दांत’ वापरून कृष्णविवरे अस्तित्वात असतात, असं भाकित अल्बर्ट आइन्स्टाइने केलं होतं. त्यानंतर 1965 मध्ये आइन्स्टाइनच्या मृत्यूच्या दहा वर्षानंतर रॉजर पेनरोज यांनी कृष्णविवर अस्तित्वात असतात, हे सिद्ध केलं.
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2020
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2020 #NobelPrize in Physics with one half to Roger Penrose and the other half jointly to Reinhard Genzel and Andrea Ghez. pic.twitter.com/MipWwFtMjz
नोबेल पारितोषिकाचा अर्धा भाग रेनहार्ड गॅझेल आणि ॲंड्रिया गेज या दोन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. या शास्त्रज्ञांनी आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एका बिंदूत प्रचंड वस्तुमान साठवलेल्या वस्तूचा शोध लावला आहे.
एका बिंदूत प्रचंड वस्तुमान सामावून घेतलेल्या वस्तूला कृष्णविवराच्या संकल्पनेनं स्पष्टीकरण देता येतं.
ॲंड्रिया गेज या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणार्या चौथ्या महिला ठरल्या आहेत.
खरं तर नोबेल कमिटीने पुरस्कार जाहीर करण्या अगोदर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा फोटो टाकला होता. त्यामुळे 2020 चा भौतिकशास्त्राचा पुरस्कार अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या कार्याची संबंधित असलेल्या शास्त्रज्ञांना मिळणार हे निश्चित होतं.