मागच्या काही महिन्यात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. यावेळी या प्रकरणाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार आणि मुंबई पोलिस यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर तब्बल ८० हजार एवढे अकाउंट्स कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत मुंबई पोलिस सायबर सेल यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे.
याबाबत सायबर सेलने तयार केलेल्या अहवालात असं समोर आलं आहे की, सुशांतसाठी चालवण्यात आलेल्या #justiceforsushant आणि #SSR हे दोन हॅशटॅग या अकाऊंटच्या माध्यमातून चालवण्यात येत होते. तसंच हे ट्रेण्ड हे परदेशातून म्हणजे पोलंड, जपान, इटली, स्लोवेनिया, तुर्की, थायलंड अशा विविध देशातून चालवण्यात येत होते. अशी सगळी माहिती पोलिसांना समजली आहे. याबाबत मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी सायबर सेलला या फेक अकाउंट्सचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता जनतेसाठी काम केलं होतं, यामध्ये ८४ पोलिसांचा मृत्यू झाला असून ६,००० पोलिस संक्रमित झाले आहेत, परंतु अशा परिस्थितीत देखील मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा कट चालू असल्याचं देखील एका अधिकाऱ्यानं सांगितलं. यामुळे सुशांतच्या प्रकरणाखाली मुंबई पोलिसांना तसेच सरकारला बदनाम करण्याचा कट चालू असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे.