कोरोना काळात आयपीएल सुरू होईल का याची शंका होती. पण कोरोनाचे नियम पाळत तेराव्या सीझनची सुरुवात 19 सप्टेंबर पासून झाली आहे. या वर्षी ही स्पर्धा दुबईत खेळवण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात मैदानात प्रेक्षक उपस्थित नसणार आहेत. यामुळे क्रिकेटप्रेमींना टीव्ही आणि हॉटस्टारच्या मदतीने आयपीएल सामन्यांचा आनंद घ्यावा लागत आहे.
टीव्हीवर मॅच बघताना एक वेगळेपण जाणवत आहे, ते म्हणजे प्रेक्षकांचा आवाज. टीव्हीवर आयपीएल पाहताना एखाद्याने विकेट घेतली किंवा चौकार, षटकार मारला तर प्रेक्षकांचा आवाज ऐकू येतोय. त्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडला आहे की मैदानावर प्रेक्षक नसता नेमका हा आवाज येतोय कसा?
तर तंत्रज्ञानाचा वापर नेमका कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आयपीएलचं तेरावा सीजन आहे. कोरोनामुळे लोकांना घरातूनच टीव्हीवर किंवा हॉटस्टारच्या मदतीने आयपीएल पहावी लागत आहे. पण प्रेक्षकांचाच आवाज नसेल तर आयपीएल पाहायला तेवढी मज्जा येणार नाही.
त्यामुळे अगोदरच्या सामन्यांमध्ये रेकॉर्ड केल्या गेलेल्या आवाजाची लायब्ररी आयपीएलसाठी काम करणाऱ्या ऑडिओ इंजिनिअर्सनी तयार केली आहे.
जेव्हा एखादा बॉल पडतो, त्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया असू शकते, याचा अंदाज लावून तो ऑडिओ चालवला जातो. सुरुवातीच्या काळात हे काम करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र जसजशी स्पर्धा पुढे जात आहे, तशी यात अचूकता येत आहे.
वातावरण निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारे आवाज वापरण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पण ज्या ठिकाणी आयपीएलची स्पर्धा चाललेली असते, त्या ठिकाणी मात्र वातावरण शांत असतं. तरी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही संघाचे ठराविक चाहते जोडलेले असतात.