रसायनशास्त्रातील 2020 चा नोबेल पुरस्कार फ्रान्सच्या इम्यन्युएल्ले कारपेंटिअर आणि अमेरिकेच्या जेनिफर डाॅडना यांना जाहीर करण्यात आला आहे. जनुकीय बदल करणारं तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
इम्यन्युएल्ले कारपेंटिअर आणि जेनिफर डाॅडना या दोन महिला शास्त्रज्ञांनी CRISPR-Cas9 हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राणी, वनस्पती तसेच माणसाच्या डीएनएमध्ये हवे तसे बदल केले जाऊ शकतात.
हे तंत्रज्ञान कसं विकसित केलं गेलं?
एकदा कारपेंटिअर बॅक्टेरियावर संशोधन करत होत्या. तेव्हा त्यांना आढळलं की बॅक्टेरियाच्या रोगप्रतिकारक संस्थेच्या एका घटकाने व्हायरसला निष्क्रिय केलं. त्या घटकावर अजून संशोधन केल्यावर कारपेंटिअर यांना समजलं की बॅक्टेरियाच्या रोगप्रतिकारक संस्थेत असा घटक आहे, जो व्हायरसच्या डीएनएमध्ये बदल करू शकतो.
पुढे 2011 मध्ये संशोधन प्रकाशित करून कारपेंटिअर आणि डाॅडना यांनी एकत्र काम करून बॅक्टेरियाच्या शरीरात होती तशीच ‘डीएनएला कापणारी कात्री’ विकसित केली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डीएनएमध्ये हवेतसे बदल करता येतात.
‘अनुवंशिक आजारांचं समूळ उच्चाटन’
एखाद्या व्यक्तीला अनुवंशिक आजार असतो. जर त्याच्या डीएनएमधून अनुवंशिक आजाराला जबाबदार असणारा डीएनएचा भाग काढला तर तो व्यक्ती बरा होऊ शकतो. CRISPR-Cas9 या तंत्रज्ञानाच्या मदतीनं डीएनएचा ‘खराब’ भाग अचूकतेने काढला जातो व त्या ठिकाणी हवे असलेले बदल केले जातात.
त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनुवंशिक आजारांचं उच्चाटन करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तसेच CRISPR-Cas9 या तंत्रज्ञानाच्या मदतीने अशी पिकं तयार केली गेली आहेत, जे दुष्काळातही तग धरू शकतात. तसेच कॅन्सर सारख्या आजारांच्या उपचारांमध्ये देखील याचा वापर होऊ शकतो.
BREAKING NEWS:
The 2020 #NobelPrize in Chemistry has been awarded to Emmanuelle Charpentier and Jennifer A. Doudna “for the development of a method for genome editing.” pic.twitter.com/CrsnEuSwGD— The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2020
फ्रान्सच्या इम्यन्युएल्ले कारपेंटिअर आणि अमेरिकेच्या जेनिफर डाॅडना या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या सहाव्या आणि सातव्या महिला ठरल्या आहेत.