हाथरसमध्ये झालेल्या ठाकूर बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. जातीय अत्याचार आणि दलित शोषण असे अनेक प्रमुख विषय घेऊन कलाकार रॅप, कविता आणि चित्राच्या माध्यमातून विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.
याचवेळी मुंबईतील एक कलाकार आपल्या कॅनव्हासच्या माध्यमातून स्वतःची अस्वस्थता रेखाटताना दिसत आहे आणि विशेषतः या चित्रकाराचे कॅनव्हास हे हाथरसमधील घटनेच्या निषेधार्थ देखील सर्वसामान्य लोकांचा आवाज होताना दिसत आहे, या कलाकाराच्या कलाकृतींमध्ये इतर कलाकारांसारखा ‘ Abstract meaning’ अथवा विनाकारण कीचकटपणा जाणवत नाही.
अाजघडीचे प्रस्थापित, तथाकथित लोकप्रिय चित्रकार हजारो, लाखो रुपयांना आपल्या कलाकृती विकताना किंवा त्याची प्रदर्शनं भरवल्याच्या बातम्या राजरोसपणे आपण वाचत असतो.
दुसऱ्या बाजूला हा चित्रकार ‘कलेचं सार्वत्रीकरण’ व्हावं या उद्देशाने आपली कला कोणत्याही संग्रहालयात न ठेवता भर चौकात लोकांच्या घोळक्यात, वस्त्यांमध्ये घेऊन जातो.
खैरलांजी, रमाबाईनगर जवखेडा आणि आत्ताचे हाथरस अशा अनेक दलित अत्याचारावरील चित्रांना लोक हातात घेऊन प्रस्थापितांना प्रश्न विचारताना दिसत आहेत.
या कलाकारचं नाव आहे डॉ. सुनील अभिमान अवचार. सुनील सर हे मुंबई विद्यापीठात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर ते एक संवेदनशील कवी आणि चित्रकार म्हणून देखील परिचित आहेत. त्यांच्या कवितेतून आणि चित्रातून त्यांची अस्वस्थता, संवेदनशीलता आणि विद्रोह जाणवतो. त्यांच्या कवितेमध्ये, कलाकृतींमध्ये सामान्य लोकांचं केलेलं चित्रण आणि त्यांच्यासाठी उठवलेला आवाज दिसतो, त्यांच्या मांडलेल्या व्यथा दिसतात, त्यासाठीचा विद्रोह जाणवतो.
त्यांनी दलित लाईव्ह मॅटर, जातीवाद, जातीयवादी पत्रकारिता, प्रशासन पद्घती, दलित अन्याय, विद्रोह या सर्व गोष्टींवर चित्रण केलं आहे. सुनील सरांचा ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’ नावाचा कवितासंग्रह देखील प्रसिध्द झाला आहे.