सध्या अनेक टीव्ही चॅनेल्समध्ये टीआरपीसाठी चढाओढ चाललेली दिसत आहे. यात बातम्यांचे चॅनल्स आघाडीवर आहेत. आता खोटी टीआरपी मिळवण्यासाठी काही चॅनेल्स प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. यात प्रसिध्द बातमी चॅनेल रिपब्लिक टीव्हीचा देखील समावेश असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
मंगळवारी मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की बार्क या संस्थेच्या टीआरपी डेटामध्ये छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली असून रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस या चॅनल्सने आपली टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर केल्याचं समोर आलं आहे.
बार्क संस्था चॅनेल्सची टीआरपी रेटिंग्ज ठरवण्याचं काम करते.
एखाद्या चॅनेलची लोकप्रियता मोजण्यासाठी टीआरपी रेटिंगचा वापर केला जातो. टीआरपी मोजण्यासाठी काही लोकांच्या घरी मीटर बसवले जातात, त्यांना ‘पीपल्स मीटर’ असं म्हटलं जातं. या मीटरवर कोणत्या चॅनेलवर, किती वेळ, कोणता कार्यक्रम पाहिला याची माहिती रेकॉर्ड होत असते.
विशेष म्हणजे हे मीटर कोणाच्या घरी बसवलं आहेत याची माहिती गुप्त ठेवली जाते. मुंबईत या पीपल्स मीटरच्या देखरेखची काम बार्क या संस्थेने ‘हंसा’ या कंपनीला दिलं होतं.
मात्र कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांनी हा टीआरपी डेटा विकल्याचा आरोप ‘हंसाने’ ठेवला आहे.
परमबीर सिंग पत्रकार परिषदेत म्हणाले की सध्या मुंबईत टीआरपी मोजण्यासाठी दोन हजार मीटर बसवण्यात आले आहेत. या मीटरची देखभाल करण्याचे कॉन्ट्रॅक्ट ‘हंसा’ या कंपनीला दिलं आहे. आरोपींनी ज्यांच्या घरी मीटर बसवले आहेत त्यातील काही लोकांना ठराविक चॅनेल दिवसभर चालू ठेवण्यासाठी पैसे दिले होते.
खोटी टीआरपी मिळवण्याच्या प्रकरणात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. बार्क संस्थेने देखील मुंबई पोलिसांना महत्त्वाचे पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर पैसे देऊन चॅनल चालू ठेवायला ज्या लोकांना सांगितलं आहे, त्यांची साक्ष उपलब्ध आहे.
मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंग
त्याचबरोबर परमवीर सिंग म्हणाले की फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनलच्या मालकांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. बार्क या संस्थेने रिपब्लिक टीव्हीवर देखील टीआरपीसोबत छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या मुंबई शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मंगळवारी रिपब्लिक टीव्हीचे संस्थापक अर्णव गोस्वामी यांना देखील समन्स पाठवण्यात येणार आहे व लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणाची तक्रार हंसा या संस्थेने पोलिसांना दिली होती. तसेच माजी कर्मचाऱ्यांसोबत सध्या काम करणारे कर्मचारी देखील यात सामील असू शकतात, असं देखील या कंपनीनं म्हंटलं आहे.