उत्तर प्रदेशातील देवरिया येथे पोटनिवडणुकीसाठी सुरु असलेल्या बेैठकीत कॉंग्रेसच्या तारा यादव यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी देवरिया येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत कॉंग्रेस नेत्या तारा यादव आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव सचिन नाईक यांच्यात वाद झाला.
पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने आणखी मुकुंद भास्कर यांना देवरिया सदरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्वत: पक्षाचे उमेदवार म्हणून तारा यादव निवडणूक लढवण्यास इच्छूक होत्या. यासंबंधी त्यांनी पक्षाच्या बैठकीत सचिन नाईक यांना प्रश्न विचारला असता या वादाला तोंड फुटले.
येत्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे तारा यादव नाराज होत्या. तारा यादव यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न विचारला असता मुकुंद मणि भास्कर आणि इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यादव यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना सभेतून बाहेर काढले. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
माध्यमांशी बोलताना तारा यादव यांनी कॉंग्रेस नेते मुकुंद मणि भास्कर ‘बलात्कारी’ असल्याचा आरोप केला आणि पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी दिल्यास समाजात चुकीचा चुकीचा संदेश जाईल अशी भीती व्यक्त केली.
मी सचिन नाईक यांना अशी विनंती करीत होते की, समाजात चांगली प्रतिमा असणारे दुसरे काही उमेदवार दाखल करावे. परंतु मला मारहाण केली गेली, यावर प्रियंका गांधी काय करतात याची वाट बघतेय, असे तारा यादव म्हणाल्या.