महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट असताना आणखीन एक चिंताजनक बातमी एनसीबीआरनं जाहीर केलेल्या आकडेवारीमधून समोर आली आहे. या आकडेवारीत शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम स्थानी असल्याचे सांगितले आहे. एकट्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण तीन हजार ९२७ म्हणजे जवळपास चार हजार इतके आहे.
देशात २०१९ या वर्षात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हणले आहे तर राज्यात २०१४, २०१५, २०१६ आणि २०१९मध्ये ३ हजार ५०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे.
भाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी न होता त्यात आणखी भर पडली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपानं ८९ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मात्र या कर्जमाफी नंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नसल्याचं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.
दरम्यान कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना २००६ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात राज्यात कंत्राटी शेतीसह इतर शेतीविषयक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु राज्यातील १.५६ कोटी शेतकऱ्यांपैकी ५० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कंत्राटी शेतीचा लाभ घेतलेला नसल्याचे म्हणले आहे.