कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या बिहार विधानसभा निवडणूकीचे चांगलेच पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून ऑनलाईन प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. परंतु उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर पक्षात बंडखोरी उफाळून आली आहे. नऊ नेत्यांनी एनडीएच्या उमेदवारांविरोधातच दंड थोपटल्यानं भाजपानं नऊ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपानं नऊ बंडखोर नेत्यांवर ही कारवाई केली आहे. या नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं असून यात राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप या बंडखोर नेत्यांचा समावेश आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. मात्र, एनडीएतील जागावाटपात अनेक जागा जदयू व मित्रपक्षांकडे गेल्यानं भाजपातील इच्छुक नेते नाराज असून त्यांनी एनडीए उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सध्या भाजपासोबत जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान भाजपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी आपण एनडीए उमेदवारांच्याविरोधात निवडणूक लढवत असून, यामुळे एनडीएसोबतच पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. हे पक्षाच्या शिस्तीविरूद्ध आहे. या कामामुळे तुम्हाला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे म्हणले आहे.