बीजेपीच्या नेत्याने आसाममधील गुवाहाटी प्राणीसंग्रहालयात वाघांना गाईचं मटण (बीफ) खायला देण्यास विरोध केला आहे. सत्यरंजन बोरा असं या नेत्याचं नाव असून सोमवारी काही लोकांच्या मदतीने प्राणिसंग्रहालयाच्या प्रमुख गेटवर गाईचं मटण वाहून नेणारी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले की, “हिंदू धर्मात गायला महत्त्वाचं स्थान आहे. मात्र या प्राणीसंग्रहालयात गायीच्या मटणाचा वापर प्रमुख खाद्य म्हणून केला जातो.” एवढच नव्हे तर प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना फक्त गाईचंच मटण का दिलं जातं, इतर प्राण्यांचं का नाही, असा देखील प्रश्न प्राणिसंग्रहालय प्रशासनाला विचारला.
तसंच प्राणीसंग्रहालयात सांबर जातीच्या हरणांचा प्रमाण जास्त आहे. या हरणांच्या मटणाचा वापर प्राणिसंग्रहालयातील मांसाहारी प्राण्यांसाठी करावा, असा अजब सल्ला बीजेपीच्या या नेत्यांने तेथील प्रशासनाला दिला.
यावर तेथील प्रशासनाने उत्तर दिलं असून आम्ही सेंट्रल झू ऑथॉरिटीच्या नियमांचं पालन करत आहे, असं सांगितलं आहे. तसेच प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचा वापर इतर प्राण्यांसाठी खाद्य म्हणून करता येत नाही, असं देखील सांगितलं आहे. सांबर प्राण्याचा समावेश वन्यजीव प्राण्यांमध्ये करण्यात आल्याने कायद्याने त्याला संरक्षण मिळाले आहे.
या घटनेवर आसामचे वनमंत्री परिमल शुक्लवैद्य यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, आम्ही केंद्राच्या नियमावलीचे पालन करत आहे. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचं योग्य पद्धतीने पोषण व्हावे म्हणून गाईचं मटण दिलं जातं. काही राज्यांमध्ये म्हशीच्या मटणाचा वापर करण्यासाठी केला जातो. मात्र आसाममध्ये त्यांचं प्रमाण कमी असल्यानं गाईचं मटण वापरलं जातं.