करोनावर लस तयार करण्याचे जगभरात प्रयत्न सुरू आहेत.कोरोनाच्या विषाणूच्या दहशतीमुळे सगळेच अत्यंत वेगाने केले जात आहे. यामध्ये अमेरिकेतील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. परंतु, या लसीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. या लसीमुळे एका स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आले आहेत.
एका वृत्तानुसार, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या करोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. या प्रायोगिक लसीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. स्वयंसेवकांच्या शरीरावर जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लसीचे दोन डोस दिल्यानंतरही कुठलेही दुष्परिणाम झाले नसल्याने ही लस कोरोनावर प्रभावी असल्याचं समजले जात आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनची AD-26-SOV 2-S लस क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात असणारी अमेरिकेतील चौथी लस आहे. परंतु, लस प्रभावी ठरली जात असतानाच अचानक लसीच्या चाचण्या थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्ताला जॉन्सन अॅण्ड जॉन्सननेही दुजोरा दिला आहे. कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजारपण आल्यामुळे या चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्याचे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आले आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनने लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे परीक्षण सुरु केले होते. या अंतर्गत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरुतील 60 हजार लोकांवर याचे परीक्षण केले जाईल, असे कंपनीने म्हटले होते. यापूर्वी अॅस्ट्रोजेनका कंपनीने कोरोना लशीची चाचणी रोखली होती. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनकडूनही अशाचप्रकारचे वृत्त समोर आले आहे. यामुळे कोरोनाचे रुग्ण जगभरात वाढत असताना कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न जगभरातुन विचारला जात आहे.