सध्या कोरोना काळात देशभरात सर्व क्रीडा स्पर्धांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार कमी व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुबईत चालू असलेली आयपीएल स्पर्धा देखील प्रेक्षकांविना सुरू आहे. लोकांना टीव्ही किंवा हॉटस्टारच्या मदतीनं आयपीएलचा आनंद घ्यावा लागत आहे.
आता महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून 18 ऑक्टोबरपासून ‘लाईव्ह कुस्ती दंगल’ स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. या स्पर्धेचं आयोजन आयपीएलच्या धर्तीवर करण्यात आलं आहे.
देशातील पहिलीच ऑनलाइन कुस्ती दंगल
कुस्ती-मल्लविद्या महासंघाने आयोजित केलेली ‘ऑनलाइन कुस्ती दंगल’ 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून या स्पर्धा पाहता येणार आहे. देशात पहिल्यांदाच ऑनलाइन कुस्ती आयोजित केल्याचा दावा कुस्ती आयोजकांनी केला आहे.
स्पर्धेतील मल्लांचं आरोग्य महत्वाचं
18 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता या स्पर्धा सुरूवात होणार असून स्पर्धेत आठ मल्ल सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मल्लांची आरोग्य तपासणी केली आहे. तसंच त्यांना सात दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. स्पर्धेदरम्यान फक्त 3 ते 4 जणांची टीम असणार आहे.
लाईव्ह कुस्ती दंगल संकल्पना अशी सुचली
दुबईत आयपीएल स्पर्धा चालू आहे. अमेरिकेत डब्ल्यूडब्ल्यूई चालू आहे. हे खेळ कोणत्याही प्रेक्षकांशिवाय सुरू आहे. तर मग महाराष्ट्रात कुस्तीची स्पर्धा का घेऊ नये, असा विचार कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे यांच्या मनात आला. यातूनच ऑनलाईन कुस्ती दंगल स्पर्धेची संकल्पना उदयास आली.
स्पर्धेचं ठिकाण तुमचा मोबाईल किंवा संगणक असेल
कुस्तीप्रेमींनी स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी करू नये, म्हणून स्पर्धेचं ठिकाण गोपनीय ठेवण्यात आलं आहे. पण ठिकाण जरी गोपनीय असलं तरी युट्यूब आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही कुस्ती दंगल पाहता येणार असल्याची माहिती गणेश मानुगडे यांनी दिली आहे. या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन कुस्ती दंगल पाहता येणार आहे.
ऑनलाईन स्पर्धेत कुस्तीचं मराठमोळं रूप जपणार
पारंपरिक कुस्तीमध्ये मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हलगीवादक असतात. आता स्पर्धेचं स्वरूप जरी ऑनलाईन असलं तरी हलगीवादकांची उपस्थिती असणार आहे.
(सदरच्या बातमीत वापरलेले फोटो कुस्ती-मल्लविद्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून घेतले आहेत.)