मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला स्वायतत्ता बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थात यापूर्वी देखील सारथी संस्थेला स्वायतत्ता होती, मात्र २१ नोव्हेंबर २०१९ ला ती काढून घेण्यात आली होती.
त्यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये सरकारविषयी नाराजीची भावना दिसत होती. याबाबत मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा देखील दिला होता त्याचबरोबर खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील आंदोलन उभं केलं होतं. यापूर्वी देखील सारथी बंद होणार याबद्दल चर्चा रंगली होती मात्र त्यानंतर अजित पवार यांनी सारथीसाठी आठ कोटी रुपयांचा निधी देऊन सारथी बंद होणार नसल्याची घोषणा केली होती.
काय आहे सारथी?
सारथी ही संस्था मराठा, कुणबी समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसंच शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आली होती. आता सारथीची काढून घेतलेली स्वायतत्ता पुन्हा एकदा दिल्यामुळे सारथीच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने विविध योजना आणि उपक्रम राबवता येणार आहेत. सरकारने घेतलेल्या या महत्वाच्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या प्रगतीसाठीचे उपक्रम राबवायला संस्थेला गती मिळणार आहे.