सध्या कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी सरकारकडून लोकांना वारंवार साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने हात धुण्याचा सल्ला दिला जातं आहे. आता नव्या संशोधनानुसार हाताच्या त्वचेवर कोरोना व्हायरस नऊ तासांसाठी सक्रीय (ॲक्टीव्ह) राहू शकतो, असं दिसून आलं आहे.
जपानी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात ही बाब उघडकीस आली आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांच्या हाताच्या त्वचेचे नमुने घेतले व त्यांचा अभ्यास केला.
तसंच शास्त्रज्ञांनी जेव्हा या हातांच्या त्वचेवर इथेनॉल लावले, तेव्हा कोरोना व्हायरस व सामान्य फ्लूचा व्हायरस पंधरा सेकंदात निष्क्रिय झाला.
सामान्य फ्लूचा व्हायरस माणसाच्या त्वचेवर 1.8 तासांसाठी ऍक्टिव्ह राहू शकतो. मात्र या व्हायरसच्या तुलनेत कोरोनाव्हायरस पाच पटीने जास्त म्हणजे नऊ तासांसाठी हातावर जिवंत राहू शकतो.
इथेनॉलचा वापर सॅनिटायझरमध्ये केला जातो. त्यामुळे सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याच्या मदतीने वारंवार हात धुण्याची गरज असल्याचं, शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हे संशोधन क्लीनिकल इन्फेक्शन्स डिसीजेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.