सोशल मिडीयावर भारताची राष्ट्रीय खेळाडू बिमला मुंडा हीचा फोटो व्हायरल होत आहे. देशाला कराटेमध्ये राष्ट्रीय पदकं मिळवून देणाऱ्या बिमला मुंडा या सध्या तांदळापासून बनवली जाणाऱ्या देशी दारू विकून आपली गुजराण करत आहेत. मुंडा यांनी ३४ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताला सिल्व्हर मेडल मिळवून दिलं होतं. देशासाठी खेळून देखील आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे.
देशी दारू विकून गुजराण
मुंडा यांच्या परिवारामध्ये चार बहीण भाऊ मिळून एकूण सहा लोक आहेत. त्यांच्या वडिलांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे ते कमवू शकत नाहीत. मुंडा यांनी फेब्रुवारी महिन्यात घर चालवण्यासाठी कराटे कोचिंग क्लास सुरू केले होते, मात्र लाॅकडाउन मुळे तेसुध्दा बंद करावे लागले आणि त्यामुळे त्यांना सध्या देशी दारू विकून आपलं घर चालवावं लागत आहे. मुंडा या दररोज ७० ते ८० ग्लास दारू विकतात. एक ग्लासची किंमत साधारण चार रुपये एवढी असते, त्यातून त्यांना रोज साधारण ३०० रुपये भेटतात.
सरकारी नोकरीची प्रतीक्षा
बिमला मुंडा यांनी असं देखील सांगितलं की, ३३ खेळाडूंना डायरेक्ट जॉब स्कीम अंतर्गत सरकारी नोकरी मिळते. त्यामध्ये मुंडा यांचं देखील नाव आहे, मात्र अजुन त्यांना नियुक्ती पत्र भेटलं नाही. याबाबत बोलतना खेळ सचिव पूजा सेहगल यांनी “एका महिन्याच्या आत त्यांना नियुक्ती पत्र दिलं जाईल.” असं सांगितलं आहे.
आता बिमला मुंडा यांना लवकरात लवकर नियुक्ती पत्र भेटून त्यांचं जीवन सुरळीत कधी होईल? असा प्रश्न सोशल मिडीयाद्वारे देशभरातुन विचारला जात आहे.