महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्या मनसेला ॲमेझॉनने प्रतिसाद दिलं आहे. मातृभाषेबद्दल आग्रही असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी देखील दखल घेतली आहे.
अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी अमेझॉन ने मान्य केली आहे. मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता, त्यास अॅमेझॉन. इनच्या जनसंपर्क विभागाकडून प्रतिसाद मिळाला आहे.
बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अॅमेझॉननं स्पष्ट केलं आहे.
मनसेच्या मागणीची खुद्द बेजॉस यांनी दखल घेतली आहे, अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनच्या या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं, असं राजसाहेब म्हणतात,’ असंही चित्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.
ॲमेझाॅनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस ह्यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं. @mnsadhikrut pic.twitter.com/tpPGCCJyDt
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) October 20, 2020
गेल्या काही दिवसांपासून मनसेनं ऑनलाइन कंपन्यांनी स्थानिक भाषेचा वापर करावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती, त्याचा परिणाम आत्ता दिसून येत आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने अॅमेझॉन व फ्लिपकार्टच्या बीकेसी येथील कार्यालयांमध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.