आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. देशात सध्या कोरोनाचा मृत्यू दर कमी असल्याच त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातील परिस्थिती सुधारत असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्युदराचं नेमकं वास्तव काय आहे? आपल्या आजूबाजूच्या देशांचा कोरोना रुग्णांचा मृत्युदर नेमका किती आहे? याची आकडेवारी जाणून घेऊया.
सध्या भारतात 76 लाख 2 हजार 414 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. तर 1 लाख 15 हजार 296 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
COVID-19 fatality rate in India is 83 for one million population, while figure is more than 600 in countries like USA, Brazil, Spain: PM Modi
— Press Trust of India (@PTI_News) October 20, 2020
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाच्या मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे. ही खरच आशादायक परिस्थिती आहे.
कोरोनामुळे दर दहा लाख लोकांमागे झालेले मृत्यू
महत्त्वाचं म्हणजे भारतात दर दहा लाख लोकांमागे फक्त 63 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, रशिया, ब्राझील या देशांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. कारण अमेरिका, रशिया आणि ब्राझील या देशात दर दहा लाख लोकांमागे अनुक्रमे 679, 169 आणि 724 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या देशांची भारतासोबत तुलना केली तर भारतातील आकडेवारी आशादायक दिसते.
पण भारताच्या आजूबाजूची देश जसं की पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांची आकडेवारी पाहिली तर चित्र काहीसं वेगळं दिसतं.
पाकिस्तानात दर दहा लाख लोकांमागे 30 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही संख्या भारताच्या तुलनेत निम्मी आहे. चीनमध्ये तर दहा लाख लोकांमागे फक्त 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच बांगलादेशमध्ये 35 लोकांचा तर श्रीलंकेत 0.6~1 कोरोनामुळे जीव गेला आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या (20 ऑक्टोबर 2020)
20 ऑक्टोबरला भारतात कोरोनाचे फक्त 7 हजार 678 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या आहे. 19 ऑक्टोबरला भारतात 46,498 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. या तुलनेत 20 ऑक्टोबरला आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी आहेत.