जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या यादीत नेटफ्लिक्सचा समावेश होतो. नेटफ्लिक्सने आता भारतीय बाजारपेठेत हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र कंपनीला भारतात म्हणावं तसं यश अजून मिळालेलं नाही.
नेटफ्लिक्सला भारतात डिस्ने प्लस हॉटस्टार तसंच ॲमेझॉन प्राईम यासारख्या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धा करावी लागत आहे.
आता भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेटफ्लिक्सने एक नवीन योजना आखली आहे. टेक क्रंच या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार भारतीयांना वीकेंडला मोफत नेटफ्लिक्स वापरता येणार आहे. नेटफ्लिक्सकडून याची भारतात लवकरच चाचणी घेतली जाईल. मात्र ही चाचणी कधी सुरू होईल हे अद्याप स्पष्ट नाही.
हे पण वाचा: बारा वर्षाच्या मुलीने हॅक केला नेटफ्लिक्सचा पासवर्ड
नेटफ्लिक्स कंपनीचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर ग्रेग पीटर्स म्हणाले की ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्स वापरायला दिल्यावर कंपनीकडून नेमक्या कोणत्या सुविधा दिल्या जातात, तसंच कोणत्या प्रकारचे ‘शो’ त्यांना पाहायला मिळतात, याची माहिती लोकांना होईल. यातून नेटफ्लिक्सला ग्राहक मिळण्याची शक्यता देखील वाढेल.
जर भारतात ही योजना यशस्वी ठरली तर जगभरात इतर देशांमध्ये देखील याचा वापर केला जाईल, असं नेटफिक्सकडून सांगण्यात आलं आहे.