मागच्या सात महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं असतानाच केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या उपक्रमाची घोषणा केली होती. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक वेबिनार मध्ये आत्मनिर्भर भारत या उपक्रमामध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. यावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
या उपक्रमामध्ये आयात कमी करून स्थानिक उत्पादनावर भर देण्याचा उद्देश असल्याचं सरकारने सांगितलं आहे, यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज देखील सरकारने जाहीर केलं आहे, मात्र यामध्ये असणारे लूपहोल्स राजन यांनी यावेळी स्पष्ट केले. आयात शुल्कात वाढ करून कोणताही देश आर्थिक प्रगत होत नसतो आणि हे जास्त वेळ चालणारं देखील नसल्याचं राजन यांनी स्पष्ट केलं आहे.
सगळ्या गोष्टींची एक प्रक्रिया किंवा प्रोसेस असते. “आपल्याला जर निर्यात स्वस्त करायची असेल तर त्यासाठी कच्चा माल परवडणाऱ्या किंमतीत बाजारात उपलब्ध असला पाहिजे, मात्र हा कच्चा माल आपल्याला आयात करून मिळतो.” असं त्यांनी सांगितलं. यावेळी ते आवर्जून चीनने जागतिक बाजारात निर्माण केलेल्या अवाढव्य स्थानाविषयी सुध्दा बोलले की, “चीनने निर्यातीच्या जोरावरच एवढं मोठं स्थान जागतिक बाजारात निर्माण केलं आहे.”
या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन त्यांनी हे स्पष्ट केलं की, आपल्याला जर खरंच आत्मनिर्भर व्हायचं असेल तर विनाकारण जास्त आयात शुल्क वाढून काही उपयोग होणार नाही, उलट त्यामुळे छोट्या व्यावसायिकांसाठी त्याचबरोबर इतर व्यवसायांसाठी लागणार कच्चा माल आयात करण्यासाठी जास्त पैसा लागणार. त्यापेक्षा देशातच यासाठी काहीतरी पर्याय तयार करण्याची गरज असल्याचं राजन यांनी सांगितलं. त्याचबरोबर केंद्रात असणाऱ्या एकाधिकार व्यवस्थेविरुद्ध देखील त्यांनी टीका केली. आपल्या देशात लोकशाही आहे आणि त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे असा टोला त्यांनी लगावला.