काही कलाकारांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवत असते. कलाकार आणि प्रेक्षक हे नातं टिकतं ते कलाकाराच्या अभिनयामुळं, तसंच त्याला प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांमुळ! या दोन्ही व्यक्तींचे स्थान खूपच महत्वाचं मानलं जातं. सिनेमा कोणताही असो, त्या सिनेमाची भाषा मराठी, हिंदी वा इतर कोणतीही असो, सिनेमातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहतो तो केवळ त्याने केलेल्या अभिनयामुळे!
९० च्या दशकात असाच एक कलाकार मराठी सिनेसृष्टीत आला. “तो आला, त्यानं पाहिलं, जिंकून घेतलं सारं! अर्थातच आपणा सर्वांच्या लक्षात असणारा कलाकार आणि आपल्या सर्वांचा आवडता लक्ष्मीकांत बेर्डे(लक्ष्या),आज लक्ष्याचा जन्मदिवस. असा कोणताही मराठी व्यक्ती नसावा की, त्याला लक्ष्या कोण हे माहीत नसावं
लक्ष्याची मराठी सिनेमात एन्ट्री झाली ती “टूर-टूर”या नाटकाममुळं. त्यावेळी हे नाटक तुफान चाललं, यातून असंख्य कलाकार मराठी सिनेसृष्टीला मिळाले. सुरुवातीच्या काळातच विनोदाचे चौकार, षटकार मारणारा कलाकार अशी ओळख लक्ष्याला मिळाली त्याचं कारण होतं त्याचे विनोदी सिनेमे आणि त्यातलं त्याचं विनोदाचं अचूक टायमिंग! लक्षाचा सिनेमा म्हटलं की, प्रेक्षकांचं दर्जेदार मनोरंजन होणार हे ठरलेलंच असायचं. ‘झपाटलेला’, ‘दे-दणादण’, ‘धूमधडाका’, ‘हमाल दे धमाल’ हे लक्षाचे काही भन्नाट विनोदी सिनेमे जे आजही मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतात.
यानंतरच्या काळात लक्ष्याने गंभीर भूमिका सुध्दा तितक्याच ताकदीनं साकारल्या. “एक होता विदूषक” डॉक्टर जब्बार पटेल यांच्या सिनेमात अबुराव हे गंभीर स्वरूपाचं पात्र सुध्दा लक्ष्याने उत्तमरितीने साकारलेलं आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नसला, तरी त्यातली लक्षाची भूमिका अधोरेखित करण्याजोगी होती. महेश कोठारे यांचा सिनेमा आणि लक्ष्याची भूमिका हे जणू सुत्र मराठी प्रेक्षकांना पाठ झालेले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. म्हणून प्रेक्षकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम देखील केलं. “अरे महेश” ही लक्ष्यानं मारलेली हाक आजही तितक्याच प्रेमाने प्रेक्षकांना ऐकावीशी वाटते.
अशोक सराफ-लक्ष्या, सचिन- लक्ष्या या जोडीचे सिनेमे सुध्दा प्रेक्षकांनी उचलून धरले. ह्या हिऱ्याने आपली चमक हिंदी सिनेसृष्टीत सुध्दा दाखवून दिली. ‘मैने प्यार किया, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’ हे काही लक्षाचे हिंदी सिनेमे जेव्हा केव्हा टीव्हीवर दाखविले जातात, तेव्हा प्रेक्षक तितक्याच आवडीनं आजही ते पाहतात. “अशी ही बनवाबनवी” मधील परश्या आजही प्रेक्षकांना खूप आवडतो. “धनंजय माने इथेच राहतात का?” हा डायलॉग कर मराठी प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आहे.
ते म्हणतात ना एक वेळ गंभीर भूमिका करणं सोपं असेल ही कदाचित, पण विनोदी भूमिका करणं त्याहूनही कठीण आहे. वयाच्या अवघ्या पंचेचाळीशीत लक्ष्याने आपला सर्वांचा निरोप घेतला. विनोदाचा बादशहा आजही जिवंत आहे, त्याच्या एकूणाएक सिनेमांमुळे आणि भविष्यातही राहील यात तिळमात्रही शंका नाही.