कलर्स वाहिनीवर मंगळवारी झालेल्या भागात बिग बॉस च्या भागात भांडणा दरम्यान प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्याबद्दल आज त्यांनी जाहीर माफी मागितली. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या शोमध्ये २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
एका व्हिडीओद्वारे कुमार सानू यांनी देखील मुलाच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. “गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असं ते म्हणाले.
कुमार सानुंचा हा व्हिडीओ TV9 मराठी या वृत्तवाहीनेने प्रसारित केला आहे
मराठी भाषेबद्दल करण्यात आलेल्या या विधाना मुळे जर नकळत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत असे वाया कॉम १८ ने सांगितले. वाया कॉम १८ ने याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंग्रजी मधून तर राज ठाकरे यांना मराठीतून माफीनामा पाठवला आहे, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी या माफीनाम्या वरून शिवसेनेला टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’ कलरस वाल्यांना पण माहिती आहे खर सरकार कुठे आहे..