‘लाॅकडाऊन’ या शब्दाचा अर्थ पूर्णतः बंद असा असला तरी लाॅकडाऊनच्या काळात माझ्या आयुष्याचे अनेक पैलू अनलाॅक झाले. मेडिकलची विद्यार्थीनी असल्याने अभ्यासामुळे इतर अवांतर पुस्तके वाचायला पुरेसा वेळ कधीच देता येत नव्हता. पण लाॅकडाऊनमध्ये मी मनसोक्त पुस्तके वाचली. यात वि. दा. सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ ही आत्मकथनपर कादंबरी, रशियन राज्यक्रांतीचा वणवा चेतवणारी मॅक्झिम गोर्की यांची ‘आई’ ही कादंबरी, कर्णाचा संपूर्ण जीवनपट मांडणारी शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय आणि रणजित देसाई यांचे ‘राधेय’, महाभारताची दुसरी बाजू मांडणारे इंद्रायणी सावकार लिखित ‘दुर्योधन’, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांची ‘ययाति, ज्या पुस्तकामुळे माझं आयुष्य घडलं ते साने गुरुजींनी लिहिलेलं ‘श्यामची आई’, अशी मी जवळजवळ 15 पुस्तके वाचली.
लाॅकडाऊनमुळे मनोरंजनाच्या जगातील वेब सिरीज या वेगळ्या क्षेत्राशी माझी ओळख झाली. मग जगातल्या सर्वात मोठ्या डाक्याची (चोरीची) कथा सांगणारी जबरदस्त संस्पेंन्स थ्रिलर ‘मनी हेस्ट’ सिरीज, फिमेल वाॅयलन्स आणि क्राइमचा पगडा असलेली ‘मिर्झापूर’, पुराणातल्या गोष्टींच्या तत्वांवर आधारलेली ‘असूर’, इंडियन राॅ डिपार्टमेंटबद्दल माहिती देणारी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकार्याची कथा मांडणारी ‘स्पेशल ऑप्स’, कालचक्रामध्ये गुरफटून टाकणारी ‘डार्क सिरीज’, मित्रांच्या दुनियेत मंत्रमुग्ध करणारी ‘कोटा डायरीज’, ‘होस्टेल डेझ’, प्रेमभंग होऊन आयुष्याची राखरांगोळी झालेल्या माणसांच्या मनात पुन्हा प्रेम पल्लवीत करणारी ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’, स्त्रीत्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन बहाल करणारी ‘द टेस्ट केस’ अशा जवळपास 30 नवीन सिरीज पाहिल्या.
उच्च शिक्षणासाठी घरापासून, आईवडिलांपासून दूर राहण्याचं शल्य नेहमीच मनात टोचत असायचं. पण लाॅकडाऊनमुळे तब्बल सहा महिन्यांहून अधिक वेळ मला माझ्या कुटुंबाबरोबर घालवता आला. पण या कालखंडात मी एक गोष्ट अशी शिकले की ज्यामुळे माझ्या व्यक्तीमत्वाने कलाटणी मिळाली, ती अशी – सहवासानं प्रेम वाढतं असं म्हणतात. हो! अगदी खरंय… पण त्याच सहवासाने एकमेकांच्या चुका स्पष्ट दिसू लागतात. सगळ्या नात्यांमध्ये चांगलं स्वीकारण्याची ताकद असते, परंतु चुकीचं असलं तरीही ते स्वीकारण्याची आणि बदलण्याची ताकद खूप कमी नात्यांमध्ये असते. जी नाती ते स्वीकारतात, ती कच्या धाग्यातून पक्क्या धाग्यात रुपांतरीत होताना मी अनुभवली.
पु. ल. म्हणायचे की प्रत्येकामध्ये एक लेखक लपलेला असतो, तो काॅलेजच्या जीवनात आपल्या व्यक्तिमत्वात डोकावत असतो. हे माझ्या बाबतीत जरा जास्तच लागू पडतं. कारण माझ्यातला लेखक शालेय जीवनापासूनच माझ्या व्यक्तीमत्वात प्रकटला आहे. डायरीबंद झालेल्या माझ्या कित्येक कविता आणि लेख लाॅकडाऊनमध्ये विविध सोशल मिडियावरील लाईव्ह कार्यक्रमातून रसिकांपर्यंत पोहोचवल्या. त्यात ‘आई’ या कवितेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मला वक्तृत्वाचीही विशेष आवड आहे. आधी मी प्रत्येक वक्तृत्व स्पर्धा ज्याठिकाणी भरते तिथं जायचे, पण लाॅकडाऊनमध्ये स्पर्धा माझ्यापर्यंत पोहोचली. आणि घरबसल्या ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांतून माझे विचार आबालवृद्धांपर्यंत पोहोचले.
पण या सगळ्या सुरळीत चाललेल्या घटनांमध्ये अनेक आव्हानात्मक क्षण सुद्धा होते. माझे आई-वडिल दोघेही शिक्षक असल्यामुळे ‘कोरोना रूग्ण चाचणी व सर्वेक्षणासाठी’ नेमून दिलेल्या भागात दररोज जावे लागत असे. कोणतेही वैद्यकिय प्रशिक्षण नसताना आणि तुटपुंज्या सुरक्षिततेच्या साधनांच्या आधारे त्यांना हे काम पार पाडायचं होतं. सुरूवातीला या गोष्टीचे आम्हा सर्वांना टेन्शन आलं, कारण दररोज 2-4 रूग्ण कोविड पॉझिटीव्ह भेटत असत. आई-बाबा घरी आल्यावर धावतच त्यांच्याकडे जाण्याची आम्हा भावंडांना सवय होती. पण त्या काळात ते आम्हाला रोखायचे. आपल्याच माणसांपासून आपल्याला अंतर ठेवून रहावं लागतं, याची तेव्हा खूप चिड यायची. पण तेव्हा भावनाविवश न होता योग्य काळजी घेतली म्हणून आम्ही सर्व भावंडे आजही खुशाल आहोत.
मध्यंतरीच्या काळात शहरात राहणाऱ्या माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळच्या माणसांना जीवघेण्या कोविडची लागण झाली. त्यातले कित्येक जण जीवानिशी गेले. पण बरेच जण बचावले. तेव्हा एक गोष्टी लक्षात आली की पद, पैसा, मान-मर्यादा या गोष्टी वेदना आणि मृत्यूपुढे क्षुल्लक असतात. म्हणून आयुष्यात पैसा, पद, प्रतिष्ठा कमावण्यापेक्षा किंवा कमावण्याबरोबरच ‘मायेची माणसं’ कमवायला हवीत. उद्योग आणि व्यवसायाबरोबरच माणसाला कला आणि छंद असावेत, कारण जेव्हा सगळं काही ठप्प होतं, तेव्हा त्याच गोष्टीच्या आधारावर माणूस तग धरून राहू शकतो.
लाॅकडाऊनमुळे आपल्या अनेक समारंभांच्या परंपरा सुद्धा बदलल्या. उदा.- ‘लग्न समारंभ’ जो कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत पार पडायचा, तो अवघ्या 50 लोकांमध्ये थाटात होऊ शकतो, हे समाजाच्या लक्षात आलं. धावपळीमुळे मी दररोज वर्तमानपत्रांच्या शिर्षकावरून केवळ नजर फिरवायचे. फायद्याच्या वाटणार्या बातम्या वाचायचे. पण लाॅकडाऊनमध्ये प्रत्येक बातमी संपूर्ण वाचायची, सवय लागली. यामुळे खूप माहिती मिळाली. अजून उल्लेखणीय बाब म्हणजे वेळ घालवण्यासाठी दोन वर्तमानपत्रे वाचताना एकाच बातमीचे दोन पैलू लक्षात येऊ लागले.त्यामुळे अंतर्गत राजकारणातल्या बर्याचशा गोष्टी लक्षात येऊ लागल्या.
लाॅकडाऊन माझ्यासाठी संकट न ठरता नव्या संधी उपलब्ध करून देणारा, माझ्याच व्यक्तीमत्वाची मला नव्याने ओळख करून देणारा, तारुण्यात थिएटर आणि भटकंतीच्या ऐशोरामाला बेड्या घालण्यासाठी हतबल केलेला, पुन्हा लहान भावंडांबरोबर ‘बालपण’ अनुभवण्याची संधी देणारा, विचारांच्या अन् पुस्तकांच्या विश्वात फुलपाखराप्रमाणे बागडण्याची अभूतपूर्व संधी देणारा, स्वप्नवत वाटणारा पण तरीही वास्तवाचं भान ठेवायला लावणारा सुखद आणि तितकाच आव्हानात्मक काळ ठरला.
– निशिगंधा अभंग (बाळसुरेखभक्त )
नक्की वाचा – ब्रा आणि स्तनांच्या कर्करोगाचा काही संबंध असतो का?
कशी झाली देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक?