देशभरात कोरोनाचा फैलाव असताना कोरोनिल हे औषध कोरोनावर मात करू शकते असे सांगत पतंजलीने विक्रीस आणलेल्या या औषधाने चार महिन्यांच्या कालावधीमध्ये २४१ कोटींची कमाई केली आहे.
द प्रिंटने दिलेल्या माहितीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे म्हणले आहे. तर कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिलचा ८५ लाखांहून अधिक खप केला आहे. यानंतर पतंजलीने या कोरोनिलच्या जाहिरातींमधूनही कमाई केली.
कोरोनावर मात करण्यासाठी रामबाण औषध आणल्याचा दावा करत पतंजलीने कोरोनील हे औषध पत्रकार परिषदेत सादर केले होते. परंतु या औषधावर टिका होण्यास सुरुवात झाली. आयुष मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागवला होता. यामुळे महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली होती.
तेव्हा स्वतः पतंजलीने आपण असा दावा केला नसल्याचे सांगितले. कंपनीने कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना सरकारकडून घेतला होता. या औषधाची किंमत ५४५ रुपये ठेवण्यात आली होती.
तसेच पतंजलीने औषध ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल अशी देखील सुविधा दिली होती.