सध्या जगासाठी निसर्गाचं, पर्यावरणाचं महत्त्व हे किती आहे? हे सर्वानाच माहीत आहे, मात्र त्याची जाणीव बहुतेक लोकांमध्ये दिसत नाही. अशी जाणीव असलेले पद्मश्री जादव पेयांग यांनी मागच्या काही वर्षांपासून यासाठी केलेलं काम आता अमेरिकेत देखील पाठ्यपुस्तकात येणार आहे. पेयांग यांनी जवळपास १,३६० एकर एवढ्या जागेवर जंगल तयार केलं होतं.
भारतातील फॉरेस्ट मॅन म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कृत जादव पेयांग यांची प्रेरणादायक गोष्ट आता अमेरिकेपर्यंत जाऊन पोहचली आहे. एवढंच नाही तर आता त्यांची ही कहाणी अमेरिकेतील ब्रिस्टल कनेक्टिकट स्कूलमध्ये अभ्यासक्रमात सामील करण्यात आली आहे.
पेयांग यांनी काही वर्षांपूर्वी ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात झाडे लावून जंगल तयार केलं होतं. ज्या जागी काहीच नव्हतं अशा जागेला त्यांनी बहरवून टाकलं होतं. हे जंगल आसामजवळील माजुली बेटावर त्यांनी तयार केलं होतं आणि त्यांच्याच नावावरून या जंगलाला मोलाई जंगल असं नाव देण्यात आलं आहे. हे जंगल जवळपास १,३६० एकर एवढ्या जागेत आहे. आता त्या जंगलात सर्व जंगली प्राणी वास्तव्य करतात. यामुळं २०१५ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च चौथा पुरस्कार पद्मश्री देण्यात आला होता.
ब्रिस्टल कनेक्टिकटचे ग्रीन हिल्स स्कूलचे शिक्षक नवमी शर्मा यांनी रविवारी, “इकॉलॉजी विद्यार्थ्यांना पद्मश्री जादव पेयांग यांच्याविषयी एक धडा शिकवण्यात येणार आहे.” अशी माहिती दिली. त्यापुढे ते असं म्हणाले की, याचं अजुन एक महत्वाचं कारण म्हणजे जगामध्ये एक व्यक्ती देखील किती महत्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतो, जर त्याच्याकडे योग्य दृष्टिकोन असेल आणि निश्चय असेल तर.”
यावरती “मी या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ होतो, मात्र अमेरिकेत आपला इतिहास शिकवला जाणार हे ऐकुन आनंद होतोय.” अशी पेयांग यांनी प्रतिक्रिया दिली.