आयपीएलची स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही स्पर्धा संपली की लगेच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी बीसीसीआयने नवीन भारतीय संघाची घोषणा केली होती. मात्र बीसीसीआयने घोषित केलेल्या भारतीय संघात रोहित शर्माला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे माजी क्रिकेटर्स आणि चाहत्यांनी बीसीसीआयच्या या निवडीवर प्रश्न उभे केले होते.
बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण देत म्हणाले की “रोहित शर्माला आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघात निवडले नाही” बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील यावर आता नवीन भाष्य केले आहे. हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले “शर्माने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याच्याबद्दल बीसीसीआय निवड समिती पुन्हा विचार करेल” पुढे गांगुली असेही म्हणाले “रोहितबद्दल सांगायचे झाल्यास, आपल्याला तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त व्हावा असे वाटत आहे. पुढे तो जर तंदुरुस्त झाला, तर मला खात्री आहे निवडकर्ते त्याच्याबद्दल पुन्हा विचार करतील”
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे मागील काही सामने खेळला नाही. रोहितच्या गैरहजेरीत पोलार्ड मुंबई संघाची धुरा सांभाळत आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेआधी तंदुरुस्त झाला, तर त्याचा नक्कीच भारतीय संघात समावेश करण्यात येईल, असे गांगुलीने स्पष्ट केले आहे.