ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज शेन वॉटसन हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.२०१६मध्ये वॉटसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.मात्र आयपीएलमध्ये तो खेळत होता. वॉटसन चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर आणि उत्कृष्ट ओपनर फलंदाज होता.
कारकीर्द
वॉटसनने यंदाच्या आयपीएल हंगामात ११ सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण २९९ धावा काढल्या. यात २ अर्धशतके देखील झळकावली.
आयपीएल मध्ये वॉटसनने एकूण १४५ सामने खेळले आहेत. यात एकूण धावा ३८७४ आहेत तर ९२ विकेट्स ही त्याच्या नावावर आहेत.
वॉटसनने ऑस्ट्रेलियाकडून ५९ कसोटी सामने खेळत त्यात ३७३१ धावा काढल्या. १९० वनडे सामने खेळत ५७५७ धावा तर ५८ टी -२० सामने खेळत १४०० धावा काढल्या आहेत.
आयपीएल २०१८ मध्ये वॉटसनने चेन्नईकडून खेळत संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला होता. यात त्याने शतक देखील झळकावले होते. आणि चेन्नईला आयपीएल २०१८ चे विजेतेपद मिळवून दिले होते.
चेन्नई संघ सोडता वॉटसनने आणखी दोन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे ते दोन संघ आहेत.
आयपीएल २०२० चा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज साठी खूप वाईट ठरला. पहिल्यांदाच चेन्नई संघ प्लेऑफ मध्ये सुद्धा जाऊ शकला नाही.
निवृत्तीच्या निर्णयावर वॉटसनकडून अधिकृत घोषणा येणे अजुन बाकी आहे. शेवटच्या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार आहे अस सीएसके ड्रेसिंग रूम मध्ये त्याने सांगितले.त्यावेळी वॉटसन खूपच भावनिक झाला होता.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वॉटसनने आपल्या सर्व साथीदारांना ही माहिती दिली आहे. शेन वॉटसनने जरी निवृत्ती घेतली तरी पुढील २०२१ च्या हंगामात धोनी वॉटसनला सीएसके सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट करून घेणार असल्याची चर्चा देखील चालू आहे.