दिवाळी सणाला अवघी पाच दिवस सुट्टी देणारा निर्णय अखेर शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. आता दिवाळीनिमित्त १४ दिवसांची सुट्टी जाहीर केलीय. ५ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केल्याचा निर्णय गुरुवारी ६ नोव्हेंबर रोजी शिक्षण विभागाने जाहीर केला होता. मात्र आता ७ नोव्हेंबरच्या नव्या आदेशानुसार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांना ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वी १२ ते १६ नोव्हेंबर अशी पाच दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. नव्या आदेशामुळे लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांनाही दिलासा मिळणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ऑनलाइन वर्ग सुरू होते.
त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने फक्त १२ ते १६ नोव्हेंबर अशी पाच दिवसंच ऑनलाइन वर्गाला सुट्टी जाहीर केली. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी-पालक नाराज होते. परिणामी शुक्रवारी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने नवा आदेश काढत ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी १४ दिवसांची दिवाळीची सुट्टी जाहीर केली.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणं शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय अजुन झालेला नाहीये.
महत्वाच्या बातम्या – बारामती: तृतीयपंथी व्यक्तीमुळे नव्हे, तर परस्परातील वादामुळे युवकाने केली आत्महत्या, स्थानिक पोर्टल्सकडून चुकीची माहिती