अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची निवड झाली आहे. येत्या काही दिवसात त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम असणार आहे. पण सोशल मीडियावर भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण आल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. या सोबत मनमोहन सिंगांचा एक सही करतानाचा फोटो देखील व्हायरल होत आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
सोशल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं आहे, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
हे पण वाचा: US election 2020: निवडणूक काळात अमेरिकन लोक गुगलवर ‘हे’ शोधत होते
मात्र जो बायडन यांच्या शपथविधीचा कार्यक्रम कसा असेल, यात येणारे प्रमुख पाहुणे कोण असतील, याची माहिती अद्याप व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसंच या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेला फोटो जुना आहे.
पोस्टमधला फोटो कधीचा आहे?
रिव्हर्स सर्च इमेज या तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर असं दिसून आलं की हा फोटो 24 नोव्हेंबर 2009 मध्ये काढण्यात आला होता. अमेरिकेचे तेव्हाचे उपराष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान हा फोटो काढण्यात आला आहे.