लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले होते. राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक जाहीर केला होता. अनलॉक प्रक्रियेमध्ये हळूहळू विविधसेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. काही काळ त्यांना प्रतिसाद कमी मिळत होता. पण सध्याच्या स्थितीला बर्यापैकी लोकांकडून या सेवांना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे.
तीन दिवसांपूर्वी राज्यातील सिनेमागृहे पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली. यामुळे सिनेसृष्टीत एक प्रकारचं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. असं असलं, तरी निर्माते आणि वितरकांकडून कोणताही नवा सिनेमा तूर्तासतरी प्रदर्शित होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. बरेच मराठी सिनेमे प्रदर्शनाअभावी खोळंबले आहेत. सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी जोवर पुरेसा वेळ मिळत नाही, तोवर सिनेमा प्रदर्शित होणार नसल्याच निर्माते आणि वितरकांकडून सांगण्यात येत आहे. सुभाष घई यांची निर्मिती असलेला ‘विजेता’ हा एकमेव मराठी सिनेमा १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे.
” ‘पांघरून’, ‘अनन्या’, ‘दगडी चाळ २’, ‘दे धक्का २’, ‘मी वसंतराव’, ‘अमलताश’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘येरे येरे पावसा’, ‘ईमेल फीमेल’, असे अनेक सिनेमे तयार आहेत. मात्र करोनाची भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नसल्याने, प्रेक्षक सिनेमा बघण्यासाठी सिनेमागृहाची पायरी चढतील का याबाबत आम्ही शासंक आहोत. त्यामुळे एवढे महिने वाट पाहिली तिथे आणखी काही दिवस वाट पाहून निर्णय घेऊ,” अशी प्रतिक्रिया ईमेल फिमेल सिनेमाचे दिग्दर्शक योगेश जाधव यांनी दिली.
या सर्व सिनेमांच्या प्रसिद्धीसाठी (प्रमोशन)वेळ लागणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कोणताही नवा सिनेमा प्रदर्शित होणार नाही असं निर्माते आणि वितरकांचे म्हणणे आहे. “दिवाळीच्या मुहूर्तावर हिंदीत मनोज वाजपेयी यांचा ‘सुरज पे मंगल भारी’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढचे नियोजन केले जाईल.” असे झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी म्हणाले आहे.
दरम्यानच्या काही दिवस ‘चोरीचा मामला’, ‘हिरकणी’, ‘बॉईज’ असे आधी प्रदर्शित झालेले सिनेमे पुन्हा प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.