बुलढाणा: लोणार सरोवराला रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेले लोणार सरोवराचे खास फोटो देखील शेअर केले आहेत.
ते ट्विटमध्ये म्हणतात की, “मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की लोणार सरोवराला रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मी 2004 मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिलं होतं. सर्वांना आकर्षित करेल, असे ते दृश्य होतं.”
“जैवविविधता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे”, असं देखील ते म्हणाले.
रामसर पाणथळ क्षेत्र म्हणजे काय?
इराणच्या रामसर शहरात 2 फेब्रुवारी 1971 मध्ये पाणथळ स्थळांचं संवर्धन करण्याचा ठराव झाला. या ठरावाची अंमलबजावणी 1975 पासून करण्यात आली. पुढे 1 फेब्रुवारी 1982 मध्ये भारताने पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धन ठरावाचा स्वीकार केला.
सध्या रामसरच्या अधिकृत वेबसाईटनुसार भारतातील 39 स्थळांना रामसर पाणथळ क्षेत्र घोषित केलं आहे. यात आता नव्यानं लोणार सरोवराची भर पडली आहे. तसंच उत्तर प्रदेशातील किथम तलावाला देखील रामसर पाणथळ क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे भारतातील एकूण 41 स्थळांचा समावेश रामसर पाणथळ क्षेत्रात करण्यात आला आहे.
लोणार सरोवराची विशेषता काय आहे?
लाखो वर्षापूर्वी उल्कापिंडाची पृथ्वीला धडक झाल्यानंतर या सरोवराची निर्मिती झाली. या सरोवरातील पाणी अत्यंत खाऱ्या स्वरूपाचे असून आम्लता देखील जास्त आहे. या पाण्यात सायनोबॅक्टरिया, प्लॅटिप्लँक्टाॅन या सारखेच सूक्ष्मजीव जगू शकतात.
रामसर पाणथळ क्षेत्रात लोणार सरोवराच्या आजूबाजूला असणाऱ्या जंगलाचा देखील समावेश आहे. या भागात 160 प्रकारचे वेगवेगळे पक्षी आढळतात. तसेच 46 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 12 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात.
सध्या शहरातील सांडपाण्यामुळे सरोवराच्या आजूबाजूला असणार्या जंगलांना आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.