जवळपास १०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या शिवाजी पार्कचं नाव आता बदलण्यात येणार आहे. लवकर या पार्कचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं होईल. यासाठी मार्च महिन्यात सभागृहात प्रस्ताव मांडण्यात आला होता. आता अधिकृतपणे महापालिकेने यावर पाटी देखील लावली आहे.
शिवाजी पार्कला खरंतर खूप मोठा इतिहास आहे. इथं अनेक राजकीय सभा झाल्या. अनेक वक्ते, नेते, खेळाडू इथं होऊन गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कितीतरी सभा, दसरा मेळावे इथं झाले. एवढंच नाही तर आपल्या सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर देखील इथं खेळून गेलाय. सुरुवातीला याचं नाव माहीम पार्क असं होतं, त्यानंतर शिवाजी पार्क असं नामांतर करण्यात आलं होतं.
का बदललं गेलं नाव?
स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख होतोय या युक्तिवादातून नाव बदलण्याची मागणी गेली अनेक वर्ष होत होती, त्यामुळे शिवसेनेने यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला होता आणि अखेर शिवाजी पार्कचं नाव बदलण्यात येणार आहे.