कराड | झी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका “लागिरं झालं जी” मालिकेतील जीजी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका कमल ठोके यांच वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी १४ नोव्हेंबरला बंगलोर इथं अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्या कर्करोगानं त्रस्त होत्या. बंगळूर इथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर १४ नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कराड ह्या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐन दिवाळीत त्यांच्या अशा जाण्यानं मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कमल यांनी तब्बल ३० वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केली आहे. त्यांचे पती गणपती ठोके हे सुद्धा शिक्षक आहे.
कमल यांनी १९९२ च्या काळात सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्या सर्व भूमिकेंना प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावतीदेखील मिळाली. ‘माहेरचा आहेर’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘नामदार मुख्यमंत्री गणपत गावडे’ या काही सिनेमातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या.
अभिनयाबरोबरच त्यांना शिक्षणाची ओढ होती. यामुळे त्यांनी आपलं शिक्षण जिद्दीने पूर्ण केलं. पती गणपत ठोके यांनी कमल यांची आवड-निवड जोपासण्यासाठी कायम त्यांना साथ दिली. अभिनयाबरोबरच त्यांना संगीताची गोडी होती. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.