जगातील प्रत्येक शास्त्रज्ञाला, साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी नोबेल पुरस्कार मिळावा, असं वाटतं असतं. गेल्या महिन्यातच नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आणि लगेचच त्यांची चित्रं सोशल मीडियावर झळकली. पण ही चित्र नेमकं कोण काढतंय, हे अनेक जणांना माहीतच नाही.
मराठी माध्यमांच्या इतिहासात प्रथमच द भोंगाने खास नोबेल विजेत्यांची चित्र रेखाटणार्या जगप्रसिद्ध चित्रकाराची मुलाखत घेतलीय.
नोबेल विजेत्यांची चित्र रेखाटणारा हा कलाकार म्हणजे निकलास अलमेहेद. स्वीडनमध्ये राहणारा 43 वर्षाचा चित्रकार.
निकलास अलमेहेद यांचा परिचय
निकलास अलमेहेद हे एक कसलेले कलाकार असून ते स्टॉकहोम, स्वीडन येथे राहतात. निकलास मोशन ग्राफिक्स तसंच ग्राफिक डिझाईनिंगचं काम करतात. पण त्यांना हातानेच चित्र काढायला जास्त आवडतं.
निकलास अलमेहेद यांना ऑक्टोबर 2012 पासून नोबेल फाऊंडेशनसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच नोबेल विजेत्यांना एक वेगळी ओळख तयार झाली. निकलास यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्हाला या कामाची संधी कशी मिळाली, तेव्हा ते म्हणतात,
नोबेल फाऊंडेशनकडून आर्ट डिरेक्टर या पदासाठी जागा निघाली होती. तेव्हा मला वाटलं की, मी हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसंच विज्ञानाची देखील मला आवड आहे. नोबेल विजेत्यांची चित्र रेखाटनं माझ्यासाठी अभिमानाचं काम असेल, असं मला वाटलं. त्यानंतर मी आर्ट डिरेक्टर पदासाठी अर्ज केला आणि सुदैवाने माझी त्यासाठी निवड झाली.
विशेष म्हणजे निकलास यांनी काढलेली चित्र हाताने तयार केलेली असतात. त्यासाठी डिजिटल माध्यमांचा कोणताही वापर केला जात नाही. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही हाताने चित्र काढण्यापेक्षा डिजीटल माध्यमांचा वापर का करत नाही. यावर निकलास म्हणतात,
मला डिजिटल माध्यमांऐवजी हाताने चित्र काढायला जास्त आवडतं. कारण हाताने चित्र काढताना भावना देखील जोडल्या जातात. तसंच मला डिजिटल माध्यमांचा वापर करणं तितकं चांगलं जमत नाही. म्हणून मी हाताने चित्र काढायला प्राधान्य देतो.
निकलास यांच्या चित्रांची खासियत म्हणजे यात फक्त काळा आणि सोनेरी रंगाचा वापर केला जातो. आता तर नोबेल फाऊंडेशनकडून सोनेरी रंगाऐवजी खऱ्या सोन्याचाच वापर केला जातोय.
नोबेल विजेत्यांची चित्र काढण्यासाठी काळा आणि सोनेरी रंगाचा वापर का केला जातो, असा प्रश्न निकलास यांना विचारला. ते म्हणतात,
सुरुवातीला जेव्हा मी नोबेल फाऊंडेशनसाठी चित्र काढायला सुरुवात केली, तेव्हा निळ्या आणि पिवळ्या रंगाचा वापर करत होतो. त्यानंतर 2017 मध्ये नोबेल फाऊंडेशनने ग्राफिक्सच्या बाबतीत मोठे बदल केले. पुढे काळ्या आणि नोबेल पुरस्काराच्या रंगाशी साम्य असणाऱ्या सोनेरी रंगाचा वापर करण्याचं ठरवलं. नंतर सोनेरी रंगाऐवजी सोन्याचा वापर करण्याचा निर्णय नोबेल फाऊंडेशने घेतला व तो जास्त यशस्वी झाला.
खरंतर नोबेल विजेत्यांच्या नावांची घोषणा होईपर्यंत ती गुप्त ठेवली जातात. ठराविक लोकांनाच याची माहिती असते. निकलास हे त्यापैकीच एक!
त्यांना या विषयी विचारलं असता गोपनीयतेचं कारण देत उत्तर देणं टाळलं. पण त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला.
2015 मध्ये साहित्याच्या क्षेत्रातील पुरस्कार वेटलाना अॅलेक्सीविश यांना मिळाला होता. त्यांचे चित्र काढण्यासाठी निकलास यांच्याकडं फक्त 40 मिनिटं होती. या 40 मिनिटात काढलेलं चित्र संपूर्ण जग पाहणार होतं. त्यामुळे याचा प्रचंड ताण निकलास यांच्यावर होता. या विषयी विचारलं असता निकलास म्हणाले की,
चाळीस मिनिटात नोबेल विजेत्याचं चित्र काढणं माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. माझ्यासमोर अशी परिस्थिती होती की कसल्याही परिस्थितीत हे चित्र मला पूर्ण करावे लागणार होतं.
“त्यामुळे आपल्या कामावर ‘फोकस’ राहणं हेच माझ्या हातात होतं. आणि अर्थातच चाळीस मिनिटात ते चित्र तयार देखील झालं.”
निकलास यांना आवडता नोबेल विजेता कोण असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की, “लिथियम बॅटरीचा शोध लावणारे संशोधक मला आवडतात. तसंच काही वर्षांपूर्वी एलईडीच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला होता. ते देखील मला आवडतात.”
नोबेल विजेत्यांची चित्र काढत असताना निकलास त्यांनी एक खंत देखील बोलून दाखवली. ते म्हणाले,
मला गोर्या लोकांची चित्रे सारखी काढावी लागतात. जर महिलांचं किंवा कृष्णवर्णीय नोबेल विजेत्यांची चित्र काढायला मिळालं, तर त्याचा आनंद माझ्यासाठी वेगळा असेल.
2020 मध्ये निकलास यांना चार नोबेल विजेत्या महिलांची चित्रे रेखाटण्याची संधी मिळाली. ही बाब त्याच्यासाठी अभिमानाची आहे, असं ते सांगतात.
जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे शास्त्रज्ञ नोबेल पुरस्कारांनी अजरामर होतील. पण त्यांना चित्रांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम निकलास अलमेहेद नक्की करतील.